टोक्यो ऑलिम्पिकमध्ये यापूर्वीच पदकनिश्चिती केलेली भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन आज इतिहास रचण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरेल. महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनासमोर जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीचे कडवे आव्हान असून ही लढत जिंकल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली बॉक्सिंगपटू ठरण्याची लव्हलिनाला संधी आहे. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती आसाम सरकारमधील मंत्री पिजुष हजारिका यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

पिजुष हजारिका यांनी यासंदर्भात एएनआयला माहिती देताना विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करुन सर्व आमदार सामना पाहणार असल्याचं स्पष्ट केलं. “आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येईल. सभागृहातील सर्व आमदार भारताची लव्हलिना बोर्गोहाइन आणि तर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेलीदरम्यानचा महिला बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहणार आहेत,” असं हजारिका म्हणाले.

आसामच्या २३ वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी ती भारताची तिसरी बॉक्सिंगपटू ठरली आहे. मात्र लव्हलिनाने सुवर्णपदकासहच माघारी परतण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लवलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

नक्की वाचा >> ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धा : पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक; पदकाच्या अपेक्षा वाढल्या

बुसेनाझविरुद्ध मी प्रथमच झुंज देणार असली तरी तिची बलस्थाने आणि कच्चे दुवे मला माहीत आहेत. माझे पदकनिश्चित झाले आहे. मात्र मला सुवर्णपदक जिंकूनच मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे बुसेनाझला नमवून अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, असं सामन्याआधी बोलताना लव्हलिनाने सांगितलं आहे.

आतापर्यंत वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताने दोन पदकं जिंकली असून लव्हलिनाचंही पदक निश्चित आहे. मात्र लव्हलिनाने सुवर्णपदकच जिंकावे अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympics 2020 assam assembly proceedings will be adjourned for 20 minutes to watch lovlina borgohain women boxing semi final match scsg
First published on: 04-08-2021 at 09:07 IST