Rohit Sharma Favorite Bowler To Hit Six: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सध्या क्रिकेटमधून मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताता दिसून येत आहे. रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. रोहित हा मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. दरम्यान रोहितला असा कोणता गोलंदाज आहे, ज्याला षटकार मारायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं त्याने हटके उत्तर दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने षटकारांचा बादशाह म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सलामीला फलंदाजी येणाऱ्या रोहितने जवळपास सर्वच गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. दरम्यान एका कार्यक्रमात त्याला षटकार मारण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. एका चाहत्याने त्याला विचारलं, असा कोणता गोलंदाज आहे, ज्याला षटकार मारायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, “खरं सांगायचं झालं, तर सर्वच गोलंदाजांना. मला सर्वच गोलंदाजांना षटकार मारायला आवडेल. समोर कोण आहे याने मला काही फरक पडत नाही. मला फक्त मारायचं असतं.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील षटकारांचा बादशाह
रोहित शर्माने षटकार मारण्याच्या बाबतीतही अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्माच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याची नोंद आहे. त्याने ५३३ डावात फलंदाजी करताना ६३७ षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने एकूण ८८ षटकार मारले आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ३४४ षटकार खेचले आहेत. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने २०३ चेंडू सीमारेषेपार पोहोचवले आहेत. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने ३०२ षटकार खेचले आहेत. या यादीत पहिल्या स्थानी असलेल्या ख्रिस गेलने ३५७ षटकार खेचले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय, कसोटी क्रिकेटला रामराम
रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय, कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. हा सामना झाल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. रोहितसह विराट आणि रवींद्र जडेजानाही निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहितने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तो आता केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे.