जागतिक हॉकी संघात स्थान मिळविण्याची क्षमता भारताच्या सध्याच्या खेळाडूंपैकी केवळ सरदारा सिंगकडेच आहे, असे परखड मत ज्येष्ठ ऑलिम्पिक हॉकीपटू बलबीरसिंग (वरिष्ठ) यांनी व्यक्त केले.
सध्याच्या भारतीय हॉकीपटूंच्या कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत बलबीर म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंचा दर्जा खूपच खालावत चालला आहे. सरदारासारखे आणखी तीन-चार खेळाडू संघात असते तर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल कामगिरी झाली असती.’’
ते म्हणाले, ‘‘कोणत्याही योजनेने किंवा पैशाच्या मदतीमुळे हॉकीची शैली विकसित होत नसते. सर्वोत्तम यशासाठी फक्त एकाग्रतेने केलेला सरावच उपयुक्त ठरतो. खेळाडूंनी बदललेले नियम व तंत्राचा पाठपुरावा केला पाहिजे. जागतिक स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती हल्लीच्या खेळाडूंकडे दिसून येत नाही.’’