अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर यंदाचा टी-२० विश्वचषक खेळला जात आहे. गट अ मध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक स्पर्धकांमध्ये काही दिवसांपूर्वी सामना पार पडला. ज्यामध्ये पाकिस्तानचा दणदणीत पराभव झाला. तीन सामने झाल्यानंतर पाकिस्तानने दोन सामने गमावून फक्त दोन गुण मिळविले आहेत. त्यामुळे सुपर ८ मध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे. विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीवर टीका होत असतानाच पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खान फिटनेटवरून टीकेचा धनी झाला आहे. सोशल मीडियावरून आझम खानच्या खान्यावरून खिल्ली उडवली जात असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजनेही आझम खानला खडे बोल सुनावले आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज म्हणाला की, आझम खानला पाकिस्तानी संघात खेळण्यापूर्वी मी दोन अटी ठेवल्या होत्या. एक म्हणजे त्याला त्याच्या फिटनेसवर काम करावे लागेल. दुसरे म्हणजे, त्याला त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यावर आणखी काम करावे लागेल. कारण त्याच्या स्थुल शरीरामुळे त्याला यष्टीरक्षण करण्यातही अडचणी येत आहेत.

“आझम खानला सहा आठवड्याचा संपूर्ण प्लॅन बनवून दिला होता. त्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग घेण्यास सांगितले होते. मात्र सहा आठवड्यानंतरही त्याचे शरीर तसेच स्थूल होते. सराव करताना तो धावण्यासही खूप वेळ घेत होता. संपूर्ण संघाला दोन किमी पळण्यासाठी १० मिनिटं लागायचे, तर आझम खानला २० मिनिटं लागत असत. मी यावर प्रश्न विचारायचो. त्यावर आझम खान म्हणायचा की, तो त्याचे सर्वोकृष्ट प्रयत्न करतोय. मला हे व्यावसायिक कारण वाटत नाही. त्यानंतरही त्याला अनेकदा संधी दिली गेली. पण त्याची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. पाकिस्तानसाठी त्याने १४ टी-२० सामन्यात फक्त ८८ धावा केल्या आहेत”, असेही मोहम्मद हाफिज यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकात खराब कामगिरी

टी-२० विश्वचषकात पाकिस्तान आणि आझम खानची कामगिरी यथातथाच राहिली. युएसए बरोबरच्या पहिल्याच सामन्यात आझम खान शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तंबूत परतत असताना त्याची प्रेक्षकांबरोबर बाचाबाचीही झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. तर भारताबरोबर झालेल्या दुसऱ्या सामन्यात आझम खानला वगळण्यात आले होते. याही सामन्यात पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव झाला.