चर्चगेट स्टेशनपासून सर्वात जवळ असलेले मैदान म्हणजे ओव्हल. या मैदानावरही बरेच सामने होत असतात, पण ही जागा ‘अ’ दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये असल्याने कोणतीही तात्पुरती सुविधा मैदानात उपलब्ध करता येऊ शकत नाही. त्यामुळेच मैदानांच्या कोपऱ्यांमध्ये खेळाडू नैसर्गिक मूत्रविसर्जनाचा मार्ग पत्करतात आणि त्यामुळेच मैदानाच्या कोपऱ्याला चेंडू गेल्यावर कुणीही आणायला धजावत नाही. एकीकडे ही जागा ऐतिहासिक यादीमध्ये असल्याचे कारण प्रशासन देत असले तरी दुसरीकडे आम्हाला काहीच पर्याय नसल्याचे खेळाडूंचे मत आहे.
एकावेळी ओव्हल मैदानाच्या एका बाजूला सात सामने होतात, त्यामुळे एका वेळेला १४ संघ आणि प्रत्येक संघात किमान १५ खेळाडू एवढय़ा किमान व्यक्ती या वेळेला मैदानात असतात. पण मैदानात कोणतीही सोय नसल्याने त्यांना राजाभाई टॉवर येथील शौचालयाकडे धाव घ्यावी लागते. पण हे शौचालय चांगल्या दर्जाचे नसल्याने खेळाडूंना जवळचा क्लब किंवा थेट चर्चगेट स्टेशन गाठावे लागते. मैदानात काही क्लब्जनी तात्पुरती शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
(समाप्त)
असुविधा
मैदानाच्या मध्यातून बाहेर पडल्यास राजाभाई टॉवरजवळ शौचालयाची व्यवस्था असली तरी तिथे पोहोचेपर्यंत १०-१५ मिनिटे लागतात. ड्रेसिंग रूमची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे महिलांचे सामने या मैदानावर होतच नाहीत.
ओव्हल मैदानावर दिवसाला बरेच सामने होतात, पण खेळाडूंसाठी कोणतीही सुविधा मैदानात नाही. जे लोक खेळायला किंवा चालायला येतात, त्यांना शौचालयासाठी चर्चगेट स्टेशन गाठण्याशिवाय पर्याय नसतो. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे शासनाने सुविधा द्यायला हव्यात. सुविधा नसल्याने काही खेळाडू मैदानांच्या बाजूला नैसर्गिक मूत्रविसर्जन करताना दिसतात. त्याची दरुगधी येते. खेळाडू त्या भागामध्ये चेंडू घ्यायलाही जात नाहीत. मैदान गलिच्छ होते. या साऱ्या प्रकारामुळे रोगराई पसरू शकते, पण या गोष्टींकडे कुणीही गांर्भीयाने पाहत नाही. ऐतिहासिक वास्तू म्हटली जाते, पण ती योग्यपद्धतीने जपली जाताना दिसत नाही. मुलींचे सामने तर या मैदानात होऊच शकत नाही. कारण त्यांच्यासाठी शौचालय किंवा ड्रेसिंग रूमची कोणतीच व्यवस्था नाही.
– दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी क्रिकेटपटू
आमच्या काळापासून या सुविधांचा अभावच जाणवतो, आताच्या घडीलाही त्यामध्ये बदल झालेला नाही. ओव्हल मैदानात मुलींचे सामने जास्त होत नाहीत. कारण मुलींसाठी कोणतीच सुविधा या मैदानात नाही. क्रिकेट हा खेळ फार मोठय़ा स्तरावर खेळला जात असला तरी स्थानिक सामन्यांसाठी मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. या गोष्टींकडे कुणी गांर्भीयाने पाहतानाही दिसत नाही. भविष्यामध्ये या गोष्टी बदलाव्यात, अशी मला आशा आहे.
– अरुंधती घोष, भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू
ओव्हल मैदानामध्ये खेळाडूंची गैरसोय होते, हे आम्हाला मान्य आहे. पण हे मैदान ‘अ’ दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीमध्ये असल्यामुळे मैदानात कोणतेच बांधकाम करता येऊ शकत नाही. फिरते शौचालयही आम्हाला या ठिकाणी पुरवता येऊ शकत नाही. मैदानातील काही जणांनी यासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही. विद्यापीठाच्या समोर एक शौचालय आहे, त्याचा वापर येथील खेळाडू करू शकतात. पण याखेरीज त्यांच्यासाठी दुसरा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.
– आनंद व्यंकटेश्वरन, क्रीडा उपसंचालक
*दिवसाचे सामने : किमान ७ *सरासरी उपस्थिती : किमान ५०० व्यक्ती.