भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा म्हणजेच बीसीसीआयचा कर्नल सी. के. नायडू हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच क्रिकेटपटू पद्माकर ऊर्फ पॅडी शिवलकर यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त-

‘हा चेंडू दैवगतीचा
फिरतसे असा उसळून,
कोणाचं जीवन उधळी…
देणं कुणास यश उजळून…’

शांताराम नांदगावकर यांच्या गीतरचनेच्या या ओळी क्रिकेटपटू पद्माकर ऊर्फ पॅडी शिवलकर यांच्या आयुष्याचं सारच जणू सांगतात. ‘जीवन म्हणजे क्रिकेट’ नावाच्या ग्रामोफोन रेकॉर्डमध्ये गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी सुनील गावस्कर आणि शिवलकर यांनी गायली आहेत. त्याच्या मुखपृष्ठावर गावस्कर आणि शिवलकर यांचं गातानाचं छायाचित्र आहे, तर मलपृष्ठावर भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांची प्रस्तावना आणि नांदगावकर यांच्या दोन कविता आहेत. यापैकी एक म्हणजे गावस्कर यांनी गायलेलं ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ हे गाणं आहे, तर दुसरं गीत हे शिवलकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीवर भाष्य करणारं आहे. नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) प्रतिष्ठेचा कर्नल सी. के. नायडू पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गेले काही दिवस शिवलकर यांच्या घरचा फोन आणि मोबाइल सारखा खणखणत आहे. अभिनंदनात न्हायलेल्या शिवलकर यांनी ‘हा चेंडू दैवगतीचा..’ हे आत्मचरित्र प्रकाशित होत असल्याचे सांगितले. ‘षटकार’ या क्रिकेटविषयक मासिकात स्तंभलेखन करताना काही भाग लिहून झाले आहेत. मात्र अजून बरंच लिहायचं बाकी आहे, असं ते म्हणाले.

बीसीसीआयचा मानाचा सन्मान मिळणार, हे कळलं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘हा पुरस्कार मला मिळेल, असं स्वप्नातच काय, जन्मातसुद्धा वाटलं नव्हतं. कारण आमची माझी आणि राजिंदर गोयल यांची कधीही भारतीय क्रिकेटनं दखल घेतली नव्हती. त्याला किमान कसोटी क्रिकेटमध्ये राखीव खेळाडू म्हणून तरी संघात स्थान मिळालं, मात्र माझ्या वाटय़ाला तेसुद्धा आलं नाही. आमच्या काळात आताच्या इतकं मोठय़ा प्रमाणात क्रिकेटचं पीक नव्हतं, तसंच पैसा आणि प्रसिद्धीही नव्हती. मला मात्र आयुष्यात उत्तम प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रांच्या क्रीडा पानांवर अनेकदा माझे मुख्य मथळे असायचे. ही सारी कात्रणं अजूनही जपून ठेवली आहेत. पण जे हवं होतं, ते मिळालं नाही, हीच खंत आताही आहे. भारतीय संघाची कॅप, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार ठरला असता. ’’

ते पुढे म्हणाले, ‘‘माझ्याविषयी ‘शिवलकर वॉज बॉर्न अ‍ॅट राँग टाइम’ असं कुणीतरी म्हटलं होतं. मला या मंडळींना विचारावंसं वाटतं की, माझी कामगिरी चुकीच्या वेळी झाली का? एक माणूस म्हणून त्यावेळी जन्मणं हे माझ्या हातात होतं का? ’’

शिवलकर हे आता ७६ वर्षांचे आहेत. क्रिकेटनं तुम्हाला काय दिलं, याचं उत्तर देताना ते म्हणतात, ‘‘नाव तर दिलंच. दर्जा दिला. ज्या दर्जासह मी खूप मोठा होऊ शकलो असतो. माझ्यापेक्षा कमी दर्जाचे खेळाडू भारताकडून खेळून गेले, दहा-दहा वष्रे खेळले. दोनशे बळी ज्यांना रणजी क्रिकेटमध्ये मिळवता आले नाहीत, तेसुद्धा बरीच वष्रे भारतीय संघाकडून खेळले. मग माझं काय चुकलं? ’’

आता शालेय वयात क्रिकेटपटू घडतात. परंतु शिवलकर यांचा क्रिकेट प्रवास शाळेतून मुळीच झाला नाही. कारण दादर विद्यामंदिर या त्यांच्या शाळेत क्रिकेट नव्हतं, त्यामुळे संघसुद्धा नव्हता, तरी क्रिकेटचा प्रवास कसा झाला, हे त्यांनी सांगितलं, ‘‘त्यावेळी क्रिकेटपटू होण्याची माझी परिस्थिती आणि इच्छासुद्धा होती. दादर विद्यामंदिरमधून एसएससी झालो. त्यानंतर तीन वष्रे नोकरी नव्हती. अनेक ठिकाणी अर्ज केले, पण कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या इमारतीत असलेल्या गजानन सुर्वे यांच्यामुळे मला क्रिकेटचं, विशेषत: गोलंदाजीचं वेड लागलं. परिसरातील थत्ते यांची मुलंसुद्धा चांगलं क्रिकेट खेळायची. याच टेनिस क्रिकेटमध्ये मी घडलो. शिवाजी पार्कच्या रस्त्यावर बाळ लेले नावाचे कामगार नेते होते. क्रिकेटविषयीच्या प्रेमापोटी त्यांनी शिवाजी पार्कमधील एका स्पध्रेत संघ स्थापन केला होता. त्या संघात सुर्वे यांच्यामुळे माझी वर्णी लागली. तिथे अनेक वष्रे खेळलो. ’’

व्यावसायिक क्रिकेट गांभीर्यानं कधी घेतलं, ही शिवलकर यांची कथा अतिशय रोचक आहे. ते उत्साहाने अगदी बारकाव्यांसह सांगतात,

‘‘शिवाजी पार्कात दत्तात्रय साठेलकरची गाठ पडली. तो ब्रॅडबरी मिलसाठीच टेनिस आणि सीझन क्रिकेट अप्रतिमपणे खेळायचा. एक दिवस साठेलकरने मला गोलंदाजी करताना पाहिलं आणि विचारलं आम्हाला डावखुरा फिरकी गोलंदाज हवा आहे. आमच्यासाठी खेळशील का?’’ मी म्हटलं ‘‘मला नोकरी हवी आहे, एसएससीनंतर तीन वष्रे झाले, मी घरीच आहे.’’ त्याने ठीक आहे असं म्हटलं. मग माझ्याकडे पांढरे कपडे आणि बूटसुद्धा नसल्याचं त्याला सांगितलं. त्याची तुला व्यवस्था करावी लागेल, असं तो म्हणाला. त्यावेळी सुभाष गुप्ते हा सलामीचा फलंदाज होता. त्याची उंची माझ्याइतकीच असल्यानं त्याचे कपडे, बूट मला झाले. त्याचा पोशाख चढवून मी साठेलकरसोबत गेलो. जिमखान्याच्या लॉबीत एक गृहस्थ वेताच्या खुर्चीत बसून मागे-पुढे डुलत होते. साठेलकरने त्या गृहस्थांशी संवाद साधला. मग त्याने माझी चाचपणी करण्यासाठी सीझन बॉल माझ्या दिशेने फेकला, तो पकडतानाच मी फरफटलो. मी इतकी वष्रे टेनिस बॉलने खेळलो, जो आताच्या तुलनेत अतिशय हलका होता. मग सीझन चेंडूनं गोलंदाजी करायची, या कल्पनेनं पोटात गोळा आला. दरदरून घामसुद्धा सुटला. मग माझ्या कानाजवळ येऊन, साठेलकरनं ते विनू मंकड आहेत, असं सांगितलं. माझ्यावरील दडपण मग आणखीन वाढलं. मी लहान असताना माझ्या काकांकडून विनूभाईंविषयी बरंच ऐकलं होतं. एवढय़ा मोठय़ा कीर्तिवान व्यक्तीसोबत गोलंदाजी करायची होती. मग मागून शब्द आले, चला बॉलिंग करा. पहिला चेंडू टाकला, कुठेतरी खट् आवाज आला.. दुसरा चेंडू टाकला, पुन्हा कुठेतरी खट् आवाज आला.. आणि कानात पुन्हा साठेलकरचे शब्द गुंजले, ‘‘अरे माय## भंडाऱ्या स्टंपात टाक!’’ तेव्हा मला कळून चुकलं की, दोन चेंडूंचे आवाज हे यष्टीचे नव्हते, तर नेटच्या दोन्ही बाजूंच्या बांबूंचे होते. मला कळलंच नाही, हे सारं काय घडतंय. गडबडीत तिसरा चेंडू टाकायला मागे वळलो आणि पाठीवर थाप पडली आणि पाहतो तर विनू मंकड. त्यांनी विचारलं, ‘‘नोकरी करेल काय?’’ त्या शब्दांनी मी सुखावलो. त्यांनी माझ्यात काय पाहिलं, हे आजही मला कळलं नाही. फिनिक्स मिलला आमचा सराव चालायचा. मिलची क्रिकेट संस्कृती मोठी होती. डॉन, फिनिक्स आणि ब्रॅडबरीचा संघ त्यावेळी नावाजलेला होता. त्यावेळी विनूभाईंनी मला कानमंत्र दिला, ‘माझी कॉपी करू नका. माझी कॉपी करेल, तो डुबेल!’’

शिवाजी पार्क जिमखान्याशी नातं कसं जोडलं गेलं, याबाबत शिवलकर म्हणाले, ‘‘दोन-तीन महिन्यांत अचूकपणे मी गोलंदाजी करू लागलो. पुरुषोत्तम शिल्डला रुईया ग्रुप अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळी दादर क्रिकेटर्सकडून विजय मांजरेकर आणि माधव मंत्री हे मोठे क्रिकेटपटू खेळत होते. आधीचे दोन फलंदाज बाद झाल्यावर मांजरेकर फलंदाजीला आले. त्यावेळी माझी गोलंदाजी पाहून मंत्री यांनी माझं नाव विचारलं. मग मांजरेकर यांनी मला विचारलं कुठे खेळतोस? मी सांगितलं, फ्रेंडसकडून! त्यावर ते म्हणाले, यापुढे खेळायचं नाही. शिवाजी पार्क जिमखान्याकडूनच खेळायच़ं’’

शिवलकर म्हणाले, ‘‘मग शिवाजी पार्क जिमखान्यात खेळाडू घडवण्याच्या कार्यात सामील झालो. खेळाडू आज आला आणि उद्या घडला असा होत नाही, ती प्रक्रिया असते. येथील अकादमीच्या प्रवासात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आठ-दहा वर्षांची मुले आमच्याकडे आली होती, त्यातील बरीचशी आता मुंबईकडून खेळत आहेत. ’’

काही वर्षांनी शिवलकर यांना स्टेट बँकेत नोकरी लागली. त्यानंतर स्वत:हून प्रयत्न केल्यामुळे टाटामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तिथं कामगिरी चांगली होत गेली. टाइम्स शिल्डचं सहा वेळा सर्वोत्तम गोलंदाजाचं पारितोषिक त्यांना मिळालं. याचप्रमाणे अखेरच्या विकेट्साठी सहा मोठय़ा भागीदाऱ्या त्यांच्याकडून झाल्या आहेत. निरलॉनविरुद्ध किरण मोरेसोबतसुद्धा त्यांनी शतकी भागीदारी केली होती. त्या काळात स्वत:च्या सरावाविषयी समाधानी नसले की, ते बराच वेळ गोलंदाजी करीत राहायचे. याबाबत त्यांनी सांगितलं की, ‘‘नेटच्या सरावाप्रसंगी पहिल्या फलंदाजापासून शेवटच्या फलंदाजापर्यंत अथक गोलंदाजी करीत राहायचो. दिलीप सरदेसाईसारख्या खेळाडूनं मला तू लवकर संपशील, असा इशारा दिला होता. मी हसून सराव चालू ठेवायचो.’’

शिवलकर यांना घडवण्यामागे कुणाची महत्त्वाची भूमिका होती, हे जाणून घेण्याची मोठी उत्सुकता होती. परंतु त्यांचं उत्तर चकित करणारं होतं, ‘‘मला घडवण्यामागे मेहनत माझ्या आतापर्यंतच्या संघांमधील वरिष्ठांची आहे. जरा चुकलं की, त्यांचे डोळे मोठे व्हायचे. चांगली गोलंदाजी कर, इतकंच ते सांगायचे. १९६०च्या दशकात चांगली गोलंदाजी कशी करायची, हे मला ठाऊक नव्हतं. सर्वच कर्णधार विश्वासानं चेंडू माझ्या हाती द्यायचे. क्षेत्ररक्षण मी मला हवं तसं लावायचो. मी अचूक यष्टीवर चेंडू टाकायचो. त्यामुळे मला अजिबात जड गेले नाही, ’’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

शिवलकर यांनी मुंबई क्रिकेट संघाचं १२४ सामन्यांत प्रतिनिधित्व केलं. या कारकीर्दीत त्यांच्या नावावर ५८९ बळींचा समावेश आहे. डावात पाच बळी तब्बल ४२ वेळा आणि सामन्यात दहा बळी १३ वेळा घेण्याची किमया साधणाऱ्या शिवलकर यांचा मुंबई क्रिकेटचा प्रवास सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा होता. याविषयी ते म्हणाले, ‘‘मी मुंबईसाठी प्रथमच खेळलो, तेव्हा पंचविशीचा होतो. त्याच्यानंतर दोन वष्रे राखीव म्हणून होतो, मग पुन्हा संघात आलो. मला वयाच्या ४८व्या वर्षी पुनरागमन करण्याचं भाग्य लाभलं.’’

१९७१च्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील मुंबई-महाराष्ट्र अंतिम सामन्याची आठवण सांगताना शिवलकर म्हणाले, ‘‘त्यावेळी अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर गेला होता. मुंबईचे सहा खेळाडू तेव्हा संघात नव्हते. त्यामुळे संघ कमकुवत झाला होता. सुधीर नाईक त्यावेळी मुंबईचे आणि चंदू बोर्डे महाराष्ट्राचे कर्णधार होते. त्यावेळी दुसऱ्या डावात मला सहा बळी मिळाले आणि मुंबईला विजेतेपद मिळाले. या सामन्यानंतर माझं मुंबईच्या संघातील स्थान स्थिर झालं. तेव्हापासून निवड समिती संघ निवडताना प्रथम कर्णधाराचं नाव आणि अकरावं माझं नाव लिहायचे, त्यानंतर बाकीच्या खेळाडूंची नावं निश्चित व्हायची. जिंकायचंय याच प्रेरणेनं मी खेळायचो.’’

रोहटकला झालेल्या मुंबई-हरयाणा सामन्याचाही किस्सा शिवलकर यांनी रंगवून सांगितला. ते म्हणाले, ‘‘कपिलदेवच्या नेतृत्वाखालील हरयाणाच्या संघात राजिंदर गोयलचा समावेश होता. त्या सामन्यात मुंबईने डावानं विजय मिळवला. दिलीप वेंगसरकरनं तर मैदानावर नांगर टाकला होता. त्या खेळपट्टीवर चेंडू गहुंजेच्या खेळपट्टीप्रमाणेच हातभर वळायचा. अशा परिस्थितीत ८० धावा काढणारी दिलीपची खेळी ही त्रिशतकाच्या तोडीची वाखाणण्याजोगी होती. मात्र मुंबईच्या संघसहकाऱ्यांना विश्वास होता की, पॅडी आहे. कपिलनं मीसुद्धा दिलीपसारखा खेळपट्टीवर चिवट झुंज देईन, असं संघाला सांगितलं होतं. पण बचाव करताना, एका चेंडूनं त्याचा घात केला आणि त्याचा बळी मला मिळाला.’’

४८व्या वर्षी पुनरागमन कसं केलं याविषयी शिवलकरांनी सांगितलं, ‘‘दिलीप वेंगसकरनं हे निश्चित केलं होतं की पॅडी मुंबईच्या संघात हवा. मी त्याला म्हटलं, आता आहेत आपल्याकडे चांगले गोलंदाज. परंतु त्यानं माझं काहीच ऐकून घेतलं नाही. पॅडी तुला खेळायचं आहे, असं ठणकावून सांगितलं. अशोक मंकडनं मला तू नाही सांग असं बजावलं. पण मी त्याला स्पष्ट केलं की, माझ्या मुंबईच्या संघाचं हे बोलावणं आहे. हे मी कसं टाळू. मुंबईकडे गोलंदाज नसल्यामुळे त्यांना वाटतं की मी गोलंदाजी करू शकतो.’’

मुंबईच्या क्रिकेटनं गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाज अधिक दिले, याबाबत शिवलकर विश्लेषण करतात, ‘‘मुंबईच्या क्रिकेटनं फलंदाज आणि गोलंदाजसुद्धा मोठय़ा प्रमाणात दिले. गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावायला हवं ना? त्यांनी अचूक यष्टीवर चेंडू टाकायची माझ्याप्रमाणेच मानसिकता ठेवायला हवी.’’

आपल्या संगीताच्या प्रेमाविषयी शिवलकर म्हणाले, ‘‘संगीत हे माझं क्रिकेटनंतरचं दुसरं प्रेम आहे. मला त्याचे नीट धडे घेता आले नाहीत, याची खंत आजसुद्धा कधीतरी वाटते. पण खेळायचो, तेव्हा मोकळ्या वेळात अनेकदा सुनील, उमेश यांच्यासोबत गाण्याच्या मैफीली रंगायच्या, आतासुद्धा गाण्याची आवड जोपासतो. मोहम्मद रफी यांची गाणी मला अतिशय आवडतात.’’

आपला आवडता गायक रफीच्या शब्दांतच शिवलकर यांनी जणू आपल्या आयुष्याचा प्रवासच उलगडला-

‘‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..’’

सौजन्य – लोकप्रभा

प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com