Asia Cup 2025 Pakistan Beat Sri Lanka by 5 wickets: आशिया चषक सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंका संघावर शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानने अंतिम सामना खेळण्याचा आशा कायम ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या मधल्या फळीने आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत या विजयात मोठं योगदान दिलं आहे. सुपर फोरमधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात जर भारताने बांगलादेशवर विजय मिळवला तर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात होईल.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. श्रीलंकाकडून कामिंदू मेंडिसने अर्धशतक झळकावलं. याशिवाय इतर सर्व फलंदाज १५ धावांची खेळीदेखील करू शकले नाहीत. तर कुसल मेंडिस आणि दासुन शनाका हे फलंदाज शून्यावर बाद झाले.
पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने ३ विकेट्स, हारिस रौफ व हुसैन तलत यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर अबरार अहमदने १ विकेट घेतली. यासह श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १३३ धावा केल्या.
श्रीलंकेने दिलेल्या १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात केली आणि संघाने एकही विकेट न गमावता ४५ धावा केल्या. पण त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने झटपट विकेट गमावल्या. पण मोहम्मद नवाज आणि हुसैन तलतने अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सांभाळला आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
साहिबजादा फरहानने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरू केली आणि फखर जमानसह ४५ धावांची जलद भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत आणलं. पण, सहाव्या आणि नवव्या षटकांदरम्यान पाकिस्तानने केवळ १७ चेंडूत चार विकेट गमावल्या. वानिंदू हसरंगा आणि महिश तीक्ष्णाच्या फिरकी जोडीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आणि पाकिस्तानच्या धावांना ब्रेक लावला. त्यानंतर, ८० धावांवर, पाचवी विकेट पडली आणि श्रीलंकाने पुनरागमन केलं. पण त्यानंतर हुसेन तलत (नाबाद ३२) आणि मोहम्मद नवाज (नाबाद ३८) यांनी ५८ चेंडूत नाबाद ५८ धावांची भागीदारी करून संघाला फक्त १८ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवून दिला.