Pakistan vs Bangladesh: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील महत्वाचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करून या स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. दरम्यान भारतीय संघाविरूद्ध कोण खेळणार याचा निर्णय या बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावरून लागणार होता. या सामन्यात बांगलादेशला सहज विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी होती. पण बांगलादेशच्या फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमुळे आणि पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह पहिल्यांदाच भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषकातील अंतिम फेरीत भिडणार आहेत.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने १३५ धावा केल्या बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या.हे आव्हान फार काही मोठं नव्हतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा धक्का बसला.
सलामीवीर फलंदाज परवेज हुसेन शून्यावर माघारी परतला. तर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सैफ हुसेन अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तोहिद हृदोय अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. मेहदी हसनने ११, नुरूल हसनने १६, जाकेर अलीने ५ धावांची खेळी केली. बांगलादेशचा संघ विजयापासून ११ धावा दूर राहिला.
पाकिस्तानने केल्या १३५ धावा
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दास खेळू शकला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी जाकेर अलीकडे सोपवण्यात आली होती. बांगलादेशचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. प्रथम गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला ८ गडी बाद अवघ्या १३५ धावांवर रोखलं. पाकिस्तानचे या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले. पाकिस्तानकडून सलामीला आलेला साहिबजादा फरहान अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला.
तर फखर जमानने १३ धावांची खेळी केली. सईम अयुब या डावातही फ्लॉप ठरला. तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार सलमान अली आगाने १९ धावांची खेळी केली. तर हुसेन हलत ३ धावांवर माघारी परतला. शेवटी मोहम्मद हरिसने ३१, शाहीन आफ्रिदीने १९, मोहम्मद नवाजने २५ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १३५ धावांवर पोहोचवली.
या दमदार विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत भिडणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ या स्पर्धेत २ वेळेस आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. आता अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.