वृत्तसंस्था, लाहोर : कर्णधार बाबर आझम (८३ चेंडूंत ११४ धावा) आणि सलामीवीर इमाम-उल-हक (९७ चेंडूंत १०६) यांनी साकारलेल्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी आणि सहा चेंडू राखून नमवले. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले ३४९ धावांचे अवघड आव्हान पाकिस्तानने ४९ षटकांत पूर्ण केले. धावांचा यशस्वी पाठलाग करताना पाकिस्तानने गाठलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शतकवीर बाबर आणि इमाम यांच्यासह सलामीवीर फखर झमान (६७), मोहम्मद रिझवान (२३) आणि खुशदिल शाह (नाबाद २७) यांनी पाकिस्तानच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद ३४८ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून बेन मॅकडरमॉटने (१०८ चेंडूंत १०४) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तसेच सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (८९), मार्नस लबूशेन (५९) आणि मार्कस स्टॉइनिस (४९) यांनीही फटकेबाजी केली. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक चार गडी बाद केले.