पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याशी विवाह केला. त्यामुळे अनेकदा शोएबचा उल्लेख भारताचा जावई असा केला जातो. यात असाच उल्लेख आणखी एका क्रिकेटपटूबाबत केला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि भारतातील शमिया आरझू हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती हसनने ट्विट करून दिली.
हसनची गतवर्षी दुबईत हरयाणाच्या शमियाशी भेट झाली होती. तेव्हा प्रथम या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरला दोघांचा दुबईत विवाह सोहळा होण्याची शक्यता आहे. या लग्नाबाबत बोलताना हसन अली म्हणाला की माझ्या लग्नात मी भारतीय क्रिकेटपटूंना नक्कीच बोलावणार आहे. आम्ही सारे जण क्रिकेटपटू आहोत. मैदानावर आम्ही एकमेकांविरोधात खेळत असलो, तरी सामना संपल्यानंतर आम्ही मित्रच असतो. त्यामुळे मी नक्कीच भारतीय क्रिकेटपटूंना लग्नासाठी आमंत्रण करणार आहे.
“भारतीय क्रिकेटपटू माझ्या लग्नासाठी दुबईत हजर राहिले, तर मला खूपच आनंद होईल. आमची स्पर्धा ही मैदानापुरती मर्यादित असते. पण मैदानाबाहेर ती स्पर्धा नसते. आम्ही सारे देशासाठी क्रिकेट खेळतो. त्यामुळे एकमेकांच्या सुखाच्या क्षणात सहभागी व्हायला साऱ्यांनाच आवडते”, असे तो म्हणाला.
हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरझू सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० सप्टेंबरला दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, “मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, काय फरक पडतो? फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या नातेवाईकांशी आमचा आजही संपर्क आहे”, असे शामियाचे वडील लियाकत अली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.