पीटीआय, मेलबर्न
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील १९९२च्या विश्वविजेत्या संघाकडून प्रेरणा घेऊन इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास बाबर आझमचा पाकिस्तान संघ सज्ज झाला आहे. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी पाकिस्तानपुढे रविवारी लयीत असलेल्या इंग्लंडचे आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या संघाने २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे एकाच वेळी मर्यादित षटकांचे दोन्ही विश्वचषक आपल्याकडे बाळगण्यास इंग्लंडचा संघ उत्सुक आहे.
यंदा १९९२च्या विश्वचषकातील घटनांची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्या विश्वचषकाप्रमाणेच यंदाची स्पर्धाही ऑस्ट्रेलियात खेळवली जात आहे. साखळी फेरीच्या सुरुवातीला केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर होता. मात्र, १९९२च्या विश्वचषकाप्रमाणेच यंदाही इतर सामन्यांतील धक्कादायक निकाल पाकिस्तानच्या पथ्यावर पडले. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता आली. उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडवर मात केली आणि आता १९९२ प्रमाणेच अंतिम फेरीत पाकिस्तानची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तान २००९नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातच झालेल्या २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर इंग्लंडमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कायापालट झाला. इंग्लंडने पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्याचे तंत्र अवलंबले. याचा सकारात्मक निकाल त्यांना मिळाला. इंग्लंडने मायदेशात झालेली २०१९ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यामुळे आता एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेते म्हणून मिरवण्याची इंग्लंडला संधी आहे. त्यांनी यंदाच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत तुल्यबळ भारताला १० गडी राखून धूळ चारली.
पावसाचे सावट
अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची ९५ टक्के शक्यता आहे. रविवारी अंतिम सामना पूर्ण न झाल्यास सोमवार हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन्ही दिवशी खेळ न झाल्यास, पाकिस्तान आणि इंग्लंडला संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
’ वेळ : दु. १.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदूी