बहिष्काराचं अस्त्र परजून म्यान केलेल्या पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळायचं ठरवलं. मात्र अनुनभवी संघाविरुद्ध जिंकताना त्यांना संघर्ष करावा लागला. युएईने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारताविरुद्धच्या सामन्यातल्या चुका कायम राखत पाकिस्तानने हाराकिरी केली. फखर झमान आणि शाहीन शहा आफ्रिदी यांच्या महत्त्वपूर्ण खेळींमुळे १४६ धावांची मजल मारता आली. युएईने सुरुवात चांगली केली पण त्यानंतर नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पाकिस्तानने ४१ धावांनी सामना जिंकत सुपर फोर फेरी गाठली आहे.

युएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा सईम अय्युब भोपळाही न फोडता तंबूत परतला. तिसऱ्या षटकात साहिबजादा फरहानही बाद झाला. कर्णधार सलमान अघाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो २० धावा करुन तंबूत परतला. फखर झमान आणि सलमानची भागीदारी डाव सावरणार असं चित्र होतं मात्र सलमान बाद झाला. सिमरनजीत सिंगने हसन नवाझला तंबूत धाडलं. खुशदिल अवघ्या ४ धावा करून माघारी परतला. फखरने एका बाजूने किल्ला लढवत ३६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. विकेटकीपर फलंदाज मोहम्मद हॅरिसने फखरला साथ दिली. त्याने १४ चेंडूत १८ धावा केल्या. जुनैद सिद्दीकीने त्याला बाद केलं. शाहीन शहा आफ्रिदीने या लढतीतही संघाची इभ्रत वाचवली. त्याने १४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २९ धावांची खेळी केली. यामुळे पाकिस्तानने १४६ धावांची मजल मारली.

युएईला कर्णधार मुहम्मद वासिमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो १४ धावा करुन तंबूत परतला. राहुल चोप्राने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. ध्रुव पराशरने २० धावा करत त्याला चांगली साथ दिली. हे दोघे बाद होताच युएईच्या विजयाच्या आशा मावळल्या. पाकिस्तानतर्फे शाहीन शहा आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

सामन्याआधी काय घडलं?

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला होता.

हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती असा आरोप नक्वी यांनी केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तान युएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचे संकेत दिले होते. मात्र आता हा सामना होत आहे.सामन्याआधी पीसीबीच्या वाटाघाटी बैठकी सुरू असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदान सोडलं नव्हतं. बहिष्कार न घालण्याचा निर्णय झाल्याने पाकिस्तानचा संघ अखेर रवाना झाला. या प्रकारामुळे सामना तासभर उशिराने सुरू करण्यात आला.

अँडी पायक्रॉफ्ट यांनी आयसीसी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. याउलट त्यांनी जोखमीची परिस्थिती शिताफीने हाताळली. कर्णधारांनी हस्तांदोलन करू नये असा निर्णय संयोजकांनी घेतला आहे हा मुद्दा पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांसमोर मांडला. आयत्यावेळी गोंधळ होऊ नये यासाठी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांशी समन्वय साधला.

पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे. पण आयसीसीने यासंदर्भात अंतर्गत चौकशी प्रक्रिया केली असून पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्या कामात कोणतीही चूक केलेली नाही तसंच नियमांचं उल्लंघन केलेलं नाही असं स्पष्टपणे नमूद केलं.

सामनाधिकारी तसंच पंचांची नियुक्ती आयसीसीतर्फे केली जाते. ही एक स्वतंत्र तटस्थ यंत्रणा आहे. पायक्रॉफ्ट यांना पदावरून दूर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. तसं होणं योग्य नाही असं आयसीसीने म्हटलं होतं.