कराची : पाकिस्तानने गुरुवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने दिलेल्या ३१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकही धाव न करता दोन गडी गमावले. त्यामुळे अखेरच्या दिवशी विजयासाठी न्यूझीलंडला आठ बळी, तर पाकिस्तानला ३१९ धावांची आवश्यकता असेल.

पाकिस्तानमध्ये २० वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने मालिका विजयाच्या इराद्याने आपला दुसरा डाव ५ बाद २७७ धावसंख्येवर घोषित केला. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि मीर हमजा यांना बाद करत सामन्यावरील पकड घट्ट केली. शफीकला कर्णधार टीम साऊदी, तर हमजाला इश सोधीने बाद केले. 

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ९ बाद ४०७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या पाकिस्तानचा पहिला डाव ४०८ धावांवर आटोपला. न्यूझीलंडला ४१ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावात डेव्हॉन कॉन्वेला (०) सुरुवातीलाच गमावले. मात्र, टॉम लॅथम (६२) आणि केन विल्यम्सन (४१) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १०९ धावांची भागीदारी रचली.  हे दोघे बाद झाल्यावर टॉम ब्लंडेल (७४) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ७४) यांनी पाचव्या गडय़ासाठी १२७ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहोचवले.