बँकॉक : युवा परणीत कौरने अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमला पराभवाचा धक्का देत गुरुवारी आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच परणीत आणि ज्योती यांनी महाराष्ट्राच्या आदिती स्वामीसह मिळून महिला सांघिक गटात भारताला सुवर्णयश मिळवून दिले. आदितीने प्रियांशच्या साथीने खेळताना मिश्र सांघिक गटात भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा >>> World Cup 2023: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंड मजबूत स्थितीत, पाकिस्तान संघासाठी काय आहे समीकरण? जाणून घ्या
कम्पाऊंड प्रकारातील तिरंदाजांनी भारताला तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळवून दिली. दोन भारतीय तिरंदाजांमध्ये झालेल्या कम्पाऊंड प्रकारातील महिला वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीत परणीत आणि ज्योती यांच्यात १४५-१४५ अशी बरोबरी झाल्याने टायब्रेकर खेळवण्यात आला. गेल्या महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत तिहेरी सुवर्णयश मिळवणाऱ्या ज्योतीला टायब्रेकरमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. शूट-ऑफमध्ये परणीतने ९-८ अशी बाजी मारताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.
मिश्र सांघिक गटाच्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने प्रियांशच्या साथीने खेळताना थायलंडच्या जोडीला १५६-१५१ अशा फरकाने पराभूत करताना सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर आदिती, ज्योती आणि परणीत यांनी महिला सांघिक गटाच्या अंतिम लढतीत चायनीज तैईच्या त्रिकुटाला २३४-२३३ असे नमवले. भारतीय त्रिकुटाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. रीकव्र्ह प्रकारातील तिरंदाजांनी निराशा केली. एकही पुरुष तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा ओलांडू शकला नाही. धीरज बोम्मादेवराला टँग चिचचुनकडून ३-७ असा, तर तरुणदीप रायला किम जे देओककडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला. महिला विभागात भजन कौर आणि तिषा पुनिया उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या.