मुष्टियुद्धासारख्या जेथे दुखापत घडण्याची शक्यता असते, अशा खेळाची स्पर्धा आयोजित करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेदरम्यान होणाऱ्या संभाव्य दुखापतीबाबत मात्र आपले हात झटकले आहेत.  रिझवी महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास ती त्याची वैयक्तिक बाब ठरणार होती.
‘स्वत:च्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभागी व्हा. कोणतीही दुखापत अथवा शारीरिक नुकसान झाल्यास मुंबई विद्यापीठ किंवा बॉक्सिंग संघटना जबाबदार राहणार नाही,’ अशी स्पष्ट सूचनाच विद्यापीठाने या स्पधेच्या नियमपत्रिकेत दिली होती. गतवर्षी आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान प्रमोद साव या बॉक्सिंगपटूच्या मृत्यूनंतर यंदा या स्पर्धेसाठीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास खेळाडूस तेथे प्रथमोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यास तात्काळ रुग्णवाहिकेची सोय तसेच रुग्णालयातील उपचारांचा खर्च याबाबत मात्र एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंतरविद्यापीठ स्पर्धेदरम्यान खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्यावर प्रथमोपचार करण्याची व्यवस्था विद्यापीठातर्फे केली जाते. मात्र दुखापत गंभीर असल्यास पुढील उपचारांची जबाबदारी खेळाडू ज्या महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्त्व करत आहे, त्या महाविद्यालयाची असते, असे मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक उत्तम केंद्रे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांला दुर्दैवाने गंभीर दुखापत झाल्यास त्याचे नुकसान होऊ नये यासाठी ग्रुप इन्शुरन्स योजना तयार करण्यात आली होती. विद्यापीठ आणि महाविद्यालय दोघांचीही यामध्ये भूमिका होती. मात्र काही मोजक्याच महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतल्याचे केंद्रे यांनी सांगितले.
‘‘खेळाडूने यश मिळवल्यास त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतात. मात्र काही नकारात्मक घटना घडल्यावर जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली जाते’’, असे कीर्ती महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रामानंद गायकवाड यांनी सांगितले. दुखापतीसारखी घटना असल्यास त्यातून सावरण्यासाठी आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक आधाराची गरज असते. त्यावेळी संबंधित सर्वानी एकत्र येऊन त्या खेळाडूला मदत करणे हे प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धा तीन-चार दिवस चालते. रुग्णवाहिकेची व्यवस्था खर्चिक असते. हा खर्च विद्यापीठाने करायचा का स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाविद्यालयाने याबाबत एक विशिष्ट सूत्र नसल्याचे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे मानद सचिव रंजन जोथाडी यांनी सांगितले. यामुळे काहीवेळा रुग्णवाहिकेसंदर्भात दिरंगाई पाहायला मिळते, असे त्यांनी पुढे सांगितले.

Story img Loader