भारताविरुद्ध क्रिकेटचे सामने खेळता यावेत यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या सर्वतोपरीने प्रयत्न करताना दिसत आहेत. बीसीसीआयने द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने, आयसीसीच्या तंटा निवारण समितीकडे दाद मागितली आहे. या समितीचा निकाल कोणत्याही स्वरुपात आला तरीही २०१९-२०२३ काळात पाकिस्तानला भारताशी सामने खेळायचेच असल्याचं, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी स्पष्ट केलं आहे. तंटा निवारण समितीचा निकाल आमच्या बाजूने लागल्यास, आगामी दौऱ्यांमध्ये भारत-पाक सामन्यांचा समावेश केला जाईल या अटीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१९-२०२३ काळातील दौऱ्यांवर आपली स्वाक्षरी केली आहे.
२०१४ साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये क्रिकेट सामने खेळवण्यासाठी दोन्ही बोर्डांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानकडून होत असलेल्या अतिरेकी हल्ल्यांचं कारण देत बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला. कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाक क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या तंटा निवारण समितीकडे दाद मागितली होती. भारताने मालिका खेळण्यास नकार दिल्यामुळे आपल्याला ७० कोटी अमेरिकन डॉलरचा फटका बसल्याचं पाक क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे. या प्रश्नावर ऑक्टोबर महिन्या दुबई येथे होणाऱ्या बैठकीत तंटा निवारण समिती आपला निकाल देणार आहे.
मात्र समितीचा निकाल आपल्या बाजूने न लागल्यास २०१९-२०२३ या काळात आमच्या वाट्याला १२३ सामने आलेले आहेत. त्यामुळे आयसीसीच्या बैठकीत आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीने मांडली असून हा आमचा एका प्रकारे विजयचं असल्याचं सेठी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कायदेशीर सल्लागारांनी बीसीसीआयविरोधात सबळ पुरावे जमा केल्याने या खटल्यात आमचाच विजय होईल, अशी खात्रीही यावेळी सेठी यांनी व्यक्त केली आहे.