आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील वादात अडकलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आंतरराष्ट्रीय आणि एलिट गटाच्या पंचांच्या यादीतून बाद झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसीने रौफ यांचा पत्ता कापला नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्यांचे नाव आयसीसीकडे पाठवलेले नाही.
सूत्रांनी सांगितले की, येत्या रविवारी नागपूरमध्ये आयसीसी आपल्या यादीतील पंचांची घोषणा करणार असून त्यामध्ये पंच रौफ यांचे नाव नाही. प्रत्येक देश आपल्या पंचांची यादी आयसीसीला पाठवत असतो आणि आयसीसी त्यामधून पंचांची आंतरराष्ट्रीय आणि एलिट गटासाठी निवड करत असते. पण यावेळी पीसीबीने आपल्या पंचांच्या यादीमध्ये रौफ यांच्या नावाचा समावेश केलेला नाही. पीसीबीने शोएब रझा, झमीर हैदर आणि एहसान रझा या तीन पंचांचा यादीमध्ये समावेश केला आहे.