पीटीआय, मुंबई : लोकांच्या अपेक्षांचा फारसा त्रास होत नाही अशी भावना मुंबई इंडियन्सला पाच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मुंबईचा संघ आगामी स्पर्धेत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे याची कल्पना ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितला आहे.
‘‘जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी मैदानात उतरता, तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा असतात. इतकी वर्षे खेळल्यानंतर मला अपेक्षांचा फारसा त्रास होत नाही. तसेच, लोक माझ्याबाबत काय बोलतात याची चिंताही मला नाही. सर्वोत्तम कामगिरी करून जेतेपद मिळवायचे आम्हाला माहीत आहे. मात्र, प्रत्येक वेळी याबाबत विचार केल्यास आपल्यावरील दबाव वाढतो,’’ असे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा हे खेळाडू आपल्या दुसऱ्या ‘आयपीएल’ हंगामात सहभाग नोंदवतील. तर, ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन करारबद्ध झाल्यानंतर प्रथमच या लीगमध्ये खेळताना दिसेल.
युवा खेळाडूंबाबत रोहितने सांगितले की,‘‘ या सर्व युवा खेळाडूंवर मला अधिक दबाव निर्माण करायचा नाही. जेव्हा आम्हाला पहिला सामना असेल तेव्हा आम्ही त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देऊ. माजी खेळाडूंना पहिल्या सामन्यांत काय अपेक्षा असतील याची कल्पना आहे. मी युवा खेळाडूंना प्रथम श्रेणी किंवा क्लब क्रिकेटमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करण्यास सांगेन. ‘आयपीएल’ हे वेगळे असले तरीही, मी त्यांना योग्य मानसिकतेसह मैदानात उतरण्याचा सल्ला देईन.’’
जसप्रीत बुमरा जायबंदी असलेल्या ‘आयपीएल’मध्ये सहभागी होणार नाही, यावर रोहितने सांगितले की,‘‘बुमरा हा आमचा आघाडीचा गोलंदाज आहे त्याची कमतरता नक्कीच जाणवेल. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत संघाकडे जोफ्रा आर्चरसारखा गोलंदाज आहे. तो चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो.’’ यंदा ‘आयपीएल’मध्ये ‘प्रभावी खेळाडू’चा नियम अमलात येणार आहे. या नियमाच्या साहाय्याने १२ खेळाडूंना सामन्यात सक्रिय भूमिका पार पाडता येणार आहे. या नियामाबाबत रोहित म्हणाला की,‘‘कर्णधार या नियमाचा वापर करतील यात शंका नाही. मात्र, हे संघाच्या सर्व बाबींवर अवलंबून असेल. तसेच, अन्य संघांकडे ‘प्रभावी खेळाडू’ कोण आहे, हेदेखील पहावे लागेल.’’
रोहितने विनंती केल्यास विश्रांतीचा विचार – बाऊचर
रोहितने चांगली लय मिळवली तर, ‘आयपीएल’च्या साखळी फेरीदरम्यान त्याला विश्रांती देण्यास काहीच समस्या नाही, असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले. गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबईचा संघ पुनरागमनासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स या सत्राची सुरुवात २ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध करणार आहे. ‘‘रोहितच्या विश्रांतीबाबत विचार केल्यास तो कर्णधार आहे. तो या वेळी चांगल्या लयीत असेल अशी अपेक्षा आहे. मी एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेऊ शकलो, तर ते संघाच्या दृष्टीने चांगले असेल. त्यानंतर त्याला एक किंवा दोन सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यात कोणतीही समस्या नाही,’’ असे बाऊचर यांनी सांगितले. रोहितने गेल्या सत्रात १९.१४च्या सरासरीने २६८ धावा केल्या होत्या. यामध्ये एकाही अर्धशतकी खेळीचा समावेश नव्हता.