Kagiso Radaba Statement: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २८२ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय अतिशय खास आहे. कारण १९९८ नंतर या संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. त्यामुळे तब्बल २७ वर्षांचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेने आयसीसीची ट्रॉफी उंचावली आहे.
दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात अनुभवी फलंदाज एडन मारक्रमने मोलाची भूमिका बजावली. त्याने धावांचा पाठलाग करताना १३६ धावांची विक्रमी खेळी केली. त्याला कर्णधार तेंबा बावूमाची साथ मिळाली. बावूमाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ६६ धावांची खेळी केली. फलंदाजांनी आपलं काम योग्यरित्या पार पाडलं. तर गोलंदाजीचा भार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आपल्या खांद्यावर घेतला. दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल, तर कगिसो रबाडाने विकेट्स काढून देणं गरजेचं आहे, हे समीकरण आधीपासूनच होतं. रबाडानेही हा भार आपल्या खांद्यावर घेत ऑस्ट्रेलियाच्या ९ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.
रबाडाने या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. दोन्ही डावात त्याने ९ गडी बाद केले. या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बॅकफूटवर गेले. दरम्यान या विजयानंतर बोलताना त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “आम्ही खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही या स्तरावर पोहोचण्यासाठी पात्र होतो. काही लोकांनी असंही म्हटलं की, आम्ही मोठ्या संघांचा सामना केला नाही. हा मुर्खपणा आहे. आम्ही यावेळी ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आमची सर्वोत्तम कामगिरी केली. सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांचे मनापासून आभार. गेले ४ दिवस आम्हाला दक्षिण आफ्रिकेत असल्यासारखं वाटलं.”
दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान अंतिम सामन्याच्या दृष्टीने खूप मोठे होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी न डगमगता आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेडून धावांचा पाठलाग करताना एडन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. त्याला साथ देत तेंबा बावूमाने ६६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजयाची नोंद केली.