निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून भारतीय बॉक्सिंग संघटनेवर (आयएबीएफ) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) तात्पुरती बंदी घातली असली तरी भारताच्या युवा बॉक्सर्सना अझरबैजान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी एआयबीएने दिली आहे. मात्र बंदी घेण्यात आलेल्या संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला या स्पर्धेसाठी सहभागी होता येणार नाही, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
अझरबैजान बॉक्सिंग महासंघाने १९ ते २४ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ए अगालारोव्ह चषक युवा बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारताला निमंत्रण पाठवले होते. आयएबीएफचे महासचिव राजेश भंडारी यांनी एआयबीएफला पत्र पाठवून खेळाडूंच्या सहभागाची विनंती केली होती. त्यावर खेळाडू आणि प्रशिक्षक यांना स्पर्धेसाठी परवानगी देण्यात आली असून विद्यमान कार्यकारिणीतील कोणताही सदस्य आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाशी पत्रव्यवहार करणार नाही, असे पत्र एआयबीएचे संचालक पॅट्रिसिया स्टेउलेट यांनी भंडारी यांना पाठवले आहे.