भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने पर्थमध्ये असून यावेळी त्याला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी विराट कोहलीच्या रुममध्ये जाऊन व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे विराट कोहली संतापला असून, त्याने इन्स्टावर पोस्ट टाकून आपली नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान, यानंतर खडबडून जागे झालेल्या हॉटेल प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

नेमकं काय झालं?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामला एक मोठी पोस्ट शेअर केली असून संताप व्यक्त केला आहे. एखाद्याच्या गोपनीयतेचा आपण सन्मान करायला हवा, मनोरंजनासाठी कोणाचाही वस्तू म्हणून वापर होऊ नये असं विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Video : हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट संतापला; ‘खासगी आयुष्य जपा’ म्हणत व्यक्त केली नाराजी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणारा विराट कोहली सध्या आपल्या संघासह पर्थमधील क्राऊन टॉवर्स हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. विराट कोहली रुममध्ये नसताना हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी आतमध्ये येऊन व्हिडीओ शूट केलं. यावेळी विराटचे कपडे, सामानालाही त्यांनी हात लावला. यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

‘आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसंच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ असं विराटने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हॉटेलकडून स्पष्टीकरण –

क्राऊन टॉवर्स हॉटेलने यांबंधी स्पष्टीकरण दिलं असून व्हिडीओ शूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. तसंच सुरक्षेतील त्रुटीसाठी माफीही मागण्यात आली आहे.

“जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं…” विराट कोहलीच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा संतापली

“आम्ही माफी मागत असून पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी सर्व काळजी घेऊ. आम्ही तत्काळ या घटनेची दखळ घेतली आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून, क्राऊनच्या अकाऊंटमधून त्यांना हटवण्यात आलं आहे. तसंच व्हिडीओ सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटवण्यात आला आहे,” असं स्पष्टीकरण हॉटेलने दिल्याचं वृत्त ESPNCricinfo ने दिलं आहे.

“आम्ही याप्रकरणी बाहेरील संस्थेकडून चौकशी करत असून, पुन्हा अशा प्रकारची घटना होणार नाही यासाठी पावलं उचलू. आम्ही याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघ आणि आयसीसीला सहकार्य करत असून, त्यांच्याकडेही माफी मागितली आहे. चौकशीदरम्यान आम्ही संपूर्ण सहकार्य करु, असंही त्यांनी सांगितलं आहे.