गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 2021) ५१व्या सामन्यात तमिळ थलायवाजचा ३७-२८ असा पराभव करत चौथा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर झेप घेतली. तामिळ थलायवाज संघ ९ सामन्यांनंतर २७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगने चमकदार कामगिरी करत सामन्यात १२ रेडिंग पॉइंट घेतले.

बंगाल वॉरियर्सने पहिल्या हाफनंतर २०-१६ अशी आघाडी घेतली. तामिळ थलायवाजचा कर्णधार सुरजीतने पहिल्या हाफमध्ये बचावात हाय ५ मिळवून चांगली कामगिरी केली होती परंतु १३व्या मिनिटाला तो संघाला ऑलआऊट होण्यापासून रोखू शकला नाही. ऑलआऊट झाल्यामुळे तमिळ थलायवाजचा संघ पूर्वार्धात पिछाडीवर पडला. बंगाल वॉरियर्ससाठी मनिंदर सिंगशिवाय अमित नरवालने बचावात चमकदार कामगिरी करत हाय ५ पूर्ण केले. तर रण सिंगनेही बचावात चांगली कामगिरी करताना ४ गुण मिळवले.

दुसऱ्या सामन्यात, पुणेरी पलटणने यू मुंबाला ४२-२३ अशा फरकाने पराभूत केले. पुणेरी पलटणचा ९ सामन्यांमधला हा चौथा विजय असून गुणतालिकेत ते दहाव्या स्थानावर आहेत. यू मुंबा ९ सामन्यांनंतर ३ विजय आणि ३ पराभवांसह पाचव्या स्थानावर आहे. पूर्वार्धानंतर पुणेरी पलटणने सामन्यात १८-१० अशी चांगली आघाडी घेतली. पुणेरी पलटणचा कर्णधार नितीन तोमरने उत्कृष्ट कामगिरी केली, तर त्याला बचावात दोन टॅकल पॉइंट्सही मिळाले. याशिवाय अस्लम इनामदार आणि मोहित गोयत यांनी प्रत्येकी तीन गुण घेतले.

हेही वाचा – VIDEO : नाट्यमयच..! तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून टीम इंडिया खवळली; विराट स्टम्प माइकमध्ये म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या सत्रात यू मुंबाचे अभिषेक सिंग आणि रिंकू फ्लॉप ठरले. २४व्या मिनिटाला यू मुंबा दुसऱ्यांदा सामन्यात ऑलआऊट झाल्याने त्यांचे सामन्यात पुनरागमन अशक्य झाले. ३२ व्या मिनिटाला यू मुंबा पुन्हा एकदा ऑलआऊट झाला आणि पुणेरी पलटणने २० गुणांची आघाडी घेतली. नितीन तोमरनेही सामना संपण्यापूर्वी बचावातील हाय ५ पूर्ण केला आणि त्याने सामन्यात ४ रेड पॉइंट्ससह एकूण ९ गुण मिळवले. अस्लम इनामदारने सामन्यात ७ गुण घेतले.