एकीकडे मला भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुखद धक्का दिला आहे, पण दुसरीकडे मला त्यांची चिंता वाटते. कारण अतिक्रिकेटमुळे वेगवान गोलंदाजी मरणासन्न होत आहे, असे मत वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केले.
‘‘भारतीय वेगवान गोलंदाजांना पाहून मी फार प्रभावित झालो. खासकरून मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांची गोलंदाजी मला आवडली. माझ्यासाठी या दोघांनीही सुखद धक्का दिला. माझ्या मते त्यांना आता चांगल्या खेळपट्टय़ा मायदेशातही मिळतील. चेंडूला खेळपट्टीवर चांगली उसळी मिळाली की वेगवान गोलंदाजी अधिक सुदृढ होतील,’’ असे होल्डिंग म्हणाले.
पण सध्याच्या क्रिकेटच्या नियमांवर त्यांनी सणकून टीका केली. ते म्हणाले की, ‘‘नवीन नियमांनुसार कोणत्याही गोलंदाजाला सातत्याने चांगली कामगिरी करता येणार नाही, कारण नवीन नियमांनुसार अखेरच्या दहा षटकांमध्ये तीनच क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ राहू शकतात. दुसरीकडे मैदानांची लांबी कमी करण्यात येते, तर मोठय़ा बॅटही वापरात येत आहेत. याचा विपरीत परिणाम वेगवान गोलंदाजीवर होत आहे.