भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका : पहिल्या लढतीवर प्रदूषणाचे सावट

भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे.

जयपूर : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाच बुधवारी जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर भारतीय संघ आता पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्यावर भर देईल. विराट कोहलीसह अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा या मालिकेत भारताच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय राहुल द्रविडसुद्धा मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने चाहत्यांचे या मालिकेकडे लक्ष लागले आहे.

मात्र जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३३७ पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक ३६४ इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे.

आठ वर्षांनी प्रथमच जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार असून जवळपास २५,००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०१३ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे अखेरचा सामना झाला होता. यंदा नियोजनानुसार लढत झाल्यास दवाचा या सामन्यावर प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दूषित हवामानाचे दाखले

* २०१७ मध्ये दिल्ली येथे भारत-श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात श्रीलंकन खेळाडूंना मुखपट्टी घालून खेळावे लागले.

* नोव्हेंबर, २०१९ मध्येसुद्धा दिल्लीतील वातावरण बिघडल्याने भारत-बांगलादेश या दोन्ही संघांतील खेळाडूंना पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी मुखपट्टी घालून सराव करावा लागला.

रोहितकडून नेतृत्वगुण आत्मसात करण्यास उत्सुक

रोहितच्या कल्पक नेतृत्वाचे सर्वच चाहते असून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून हेच कौशल्य आत्मसात करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मत भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार के. एल. राहुलने व्यक्त केले. ‘‘कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची जोडी भारतीय क्रिकेटला शिखरावर नेईल, यात शंका नाही. विशेषत: रोहितमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक असून प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्याच्याकडून नेतृत्वाचे बारकावे शिकण्यासाठी मी आतुर आहे,’’ असे राहुल पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार  परिषदेत म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pollution in jaipur likely to hit first t20 cricket match of india new zealand zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या