गेल्या वर्षी कांस्यपदकाने हुलकावणी दिल्यामुळे मी काहीशी निराश झाले होते. पण या वेळी कोणत्याही परिस्थितीत पदक मिळवण्याचा निर्धार मी बाळगला होता. त्यासाठी सरावातही कठोर मेहनत घेतली होती. त्यामुळे सुवर्णपदकाची खात्री होती. अखेर माझ्या मेहनतीचे चीज झाले, असे उद्गार आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घटकरने काढले.
कुवेतमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत पूजाने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत विजेतेपद मिळविताना जागतिक व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती येई सिलिंग तसेच रौप्यपदक विजेती दुई वेई या दोन्ही चीनच्या खेळाडूंवर मात केली. तिचे हे यश खरोखरीच सनसनाटी आहे. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी ती सोमवारी रवाना होत आहे. आतापर्यंतच्या कामगिरीविषयी व भावी कारकिर्दीबाबत तिच्याशी केलेली बातचीत-
कुवेतमधील स्पर्धेतील तुझ्या कामगिरीविषयी काय सांगशील?
या स्पर्धेत पदक मिळविण्याची खात्री होती. कारण गतवर्षी याच स्पर्धेत माझे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. त्या वेळी पहिली तीनही पदके चीनच्या खेळाडूंनी जिंकली होती. पुढच्या वर्षी या खेळाडूंपैकी एका खेळाडूला मागे टाकून पदक मिळवायचेच हा मी त्याच वेळी निर्धार केला होता. त्यानुसार मी सरावाचे नियोजन केले होते. यंदा पात्रता फेरीतून अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर मला पदकाची खात्री वाटू लागली.
अंतिम फेरीत सिलिंग हिच्याशी स्पर्धा करताना दडपण आले होते काय?
प्रत्येक स्पर्धकाला महत्त्वाच्या क्षणी दडपणाचा सामना करावाच लागतो. अंतिम फेरीत सिलिंग हिच्यासह अनेक अनुभवी स्पर्धकांचे माझ्यापुढे आव्हान होते, मात्र अंतिम फेरी सुरू झाल्यानंतर मी फक्त माझ्या नेमबाजीवरच लक्ष केंद्रित केले. माझी कामगिरी अपेक्षेनुसार होत आहे, याचाच मी विचार करीत होते. बाकीच्या खेळाडूंचे काय गुण आहेत, याचा मी विचार केला नाही. त्यामुळेच मला सुवर्णपदकाला गवसणी घातला आली.
या सुवर्णपदकाचे श्रेय कोणाला देशील?
अर्थात माझी आई भारती तसेच माझे परदेशी प्रशिक्षक स्टानिस्लास लॅपिडास व सार्जिक थॉमस यांना द्यावे लागेल. माझी आई माझ्यासाठी आईवडील या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. सुरुवातीच्या संघर्षमय कारकिर्दीनंतर तिच्या अथक प्रयत्नांमुळेच मी आता आत्मविश्वासाने या खेळात कारकीर्द करू शकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत चमक दाखवावी ही बाबांची इच्छा होती. आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्यामुळे माझे स्वप्न साकार झाले आहे, मात्र हे यश पाहण्यासाठी माझे बाबा हयात नाहीत. ते असते तर माझा आनंद अधिक द्विगुणित झाला असता.
ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे सहकार्य तुला मिळाले आहे, त्याविषयी काय सांगता येईल?
या संस्थेनेच आपणहून माझी त्यांच्या मिशन ऑलिम्पिक योजनेत निवड केली. परदेशी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण, क्रीडा मानसतज्ज्ञ वैभव आगाशे, फिजिओ निखिल लाटे, तसेच मला नेमबाजीसाठी लागणारी आयुधे व अॅम्युनिशन आदी सर्व गोष्टींबाबत या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. केव्हाही तत्परतेने मदत करण्यास ते तयार असतात.
नेमबाजीत गेल्या पाच-सहा वर्षांत कोणते बदल तुला जाणवत आहेत?
अभिनव बिंद्राने बीजिंग येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर या खेळाची लोकप्रियता खेडोपाडी पसरली आहे. केवळ शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक नवोदित खेळाडू या खेळात कारकीर्द करण्याचे ध्येय बाळगत आहेत व त्यानुसार सराव करीत आहेत. या खेळाकडे पाहण्याचा लोकांचा व प्रायोजकांचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. पूर्वी खेळाडूंना अॅम्युनिशन व शूटिंग रेंजबाबत अनेक समस्या जाणवत असत. शासनाचीही संपूर्ण मदत या खेळास लाभली आहे. आता या समस्या जवळजवळ दूर झाल्या आहेत.
ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करणार आहेस?
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये किमान कांस्यपदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धात्मक सराव व प्रशिक्षण घेत आहे. यंदा जागतिक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आदी अनेक स्पर्धा असल्यामुळे आम्हाला भरपूर सराव मिळणार आहे. अशा स्पर्धामधून सर्वोत्तम कामगिरी करीत ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यासाठी मी प्राधान्य देत आहे. ही पात्रता पूर्ण केल्यानंतर ऑलिम्पिक पदकाकरिताच मी कठोर परिश्रम करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
सुवर्णपदकाची खात्री होती
गेल्या वर्षी कांस्यपदकाने हुलकावणी दिल्यामुळे मी काहीशी निराश झाले होते. पण या वेळी कोणत्याही परिस्थितीत पदक मिळवण्याचा निर्धार मी बाळगला होता.

First published on: 24-03-2014 at 04:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja ghatkar expecting gold medal in asian air gun championship