इंदूर : सलामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सोमवारी सराव सत्रात एकत्र फलंदाजी केली. पाच दिवसांच्या प्रारूपातील खराब कामगिरीनंतर उपकर्णधार पदावरून हटवल्यानंतर राहुलने सराव सत्रात मेहनत घेतली. चांगल्या लयीत असलेल्या गिलला संधी न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दोन्ही फलंदाजांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली नेटमध्ये जवळपास ३० मिनिटे फलंदाजी केली. संघ व्यवस्थापनाला राहुलच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला अतिरिक्त संधी मिळत आहेत. मात्र, अपयशी ठरल्याने त्याच्यावर दबावही वाढत आहे. दुसरीकडे गिलने सर्व प्रारूपात आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. गिलने सरावादरम्यान आक्रमक खेळ केला तर, राहुलने बचावावर अधिक भर दिला. राहुलने फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारले. मुख्य नेटमध्ये सराव केल्यानंतर गिल आणि राहुल यांनी ‘थ्रोडाउन’चा सामना केला.
दिल्लीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगल्या लयीत दिसले. मात्र, त्यांना मोठी खेळी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ केला. मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अश्विनने गोलंदाजी नंतर ‘स्वीप’चा फटका खेळण्याचा सराव केला.
