पडद्यावर दिसणाऱ्या नायक-नायिकांचे, खेळाडूंचे आपण तोंडभरून कौतुक करतो. पडद्यावर दिसणाऱ्यांना ग्लॅमर मिळते, त्यांची चर्चा होते, त्यांना आदर्शवतही मानले जाते. पण या लोकांना पडद्यावर दाखवण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलही चोख माहिती देणाऱ्या पडद्यामागच्या व्यक्तींच्या नशिबी मात्र या गोष्टी कधीही येत नाही. प्रदीप पुथरन आणि जयंता बांदेकर, या दोन पडद्यामागच्या व्यक्ती जवळपास ३० वर्षांपासून क्रिकेटशी निगडित क्षेत्रात कार्यरत आहेत. पुथरन हे जवळपास १९८० पासून वानखेडेवरील पारंपरिक धावफलक सांभाळत आहेत. तर दूरचित्रवाणी प्रक्षेपण क्षेत्रात बांदेकर काम करतात. आतापर्यंत खेळाची सेवा करूनही जास्त परिचित, वलयांकित नसलेल्या, पण बऱ्याच विक्रमांचे साक्षीदार असलेल्या या दोन असामी वानखेडे स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड कसोटी सामन्यालासुद्धा आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८०मध्ये दूरचित्रवाणीचा सुतराम संबंध नव्हता. स्टेडियमध्ये कुणी किती धावा केल्या, बळी मिळवले, हे पाहण्यासाठी स्क्रीन्सही नव्हते. त्या वेळी जवळपास ३३ हजार प्रेक्षकांच्या भाऊगर्दीत एकच अढळ आणि विश्वासार्ह जागा होती आणि ती म्हणजे पारंपरिक धावफलक. कधीही न चुकता खेळाडूंसह चाहत्यांना खेळाची माहिती देण्याचे काम पुथरन गेले ३६ वर्षे अविरत करीत आहेत.

‘‘पूर्वी नॉर्थ स्टँडमध्ये मरिन ड्राइव्हच्या बाजूला सर्वात वरच्या बाजूला धावफलक होता. त्या वेळी फक्त दोनच माणसे कामाला होती. लहानपणापासून मला क्रिकेटचे वेड. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कॉलनीत मी राहायचो आणि खेळायचोही. पण मोठय़ा स्तरावर खेळता आले नाही. कधी कधी सामन्याला यायचो तेव्हा हे काम करायला दिले जायचे. त्या वेळी माझ्यातली अचूकता पाहून माझ्याकडे कायमस्वरूपी हे काम आले,’’ असे पुथरन सांगतात.

‘‘तंत्रज्ञानामध्ये बदल झाला, मैदानात स्क्रीन्स आल्या. डिजिटल धावफलक आले. पण भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मैदानात आल्यावर फक्त आमचाच धावफलक पाहायचा. त्याचा आमच्या कामावर विश्वास पाहून भरून येते,’’ असे पुथरन सांगत होते.

‘‘आतापर्यंत अगणित सामने वानखेडेवर पाहिले. जवळपास सारेच आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएलचे सामनेही. आठवणींचे गाठोडे उघडले की जीवन सार्थकी लागते. भारताचा विश्वविजय, सचिनची अखेरची कसोटी, सारेच या मैदानात मी पाहिले. अजून आयुष्यात काय हवे. या कामाचा मी अजूनही आनंद घेतो म्हणून मी ते करतो आणि शेवटपर्यंत करत राहीन,’’ असे पुथरन म्हणाले.

याचप्रमाणे बांदेकर हे शाळेत असल्यापासून कबड्डी, खो-खो, क्रिकेट खेळत आले आहेत. १९८५पासून ते प्रसारणाच्या क्षेत्रात आहे. पूर्वीच्या व्हीसीआरपासून ते आताच्या ‘फोर-के’ तंत्रज्ञानापर्यंतचा कालावधी त्यांनी पाहिला आहे.

‘‘सध्याच्या घडीला क्रिकेटसाठी १६ कॅमेऱ्यांचे ३० किट्स आम्ही स्टेडियममध्ये लावत असतो. त्या वेळी कोणत्या गोष्टींमध्ये चाहत्यांना रुची असेल, हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे असते. लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे मला ते जमते, असे सहकारी म्हणतात. पूर्वी मी काही गोष्टी बनवायचो, जसे यष्टीमधील कॅमेराही मी बनवला होता, पण आता या साऱ्या व्यापामुळे मला ते करता येत नाही,’’ असे बांदेकर म्हणाले.

‘‘२००३ साली मोबाइलवर जो धावफलक दाखवला जायचा, त्याचे कामही माझ्याकडेच होते. मी २००३ ते आतापर्यंत सारे क्रिकेट विश्वचषक प्रसारित केले आहेत. त्याचबरोबर आठ आयपीएल स्पर्धामध्येही माझा सहभाग होता. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धाही मी केल्या आहेत. या साऱ्यामध्ये लोकांची रुची आणि स्वत:जवळील उपलब्धता याची योग्य ती सांगड घालावी लागते. अमेरिकेमध्ये जे क्रिकेटचे दोन सामने खेळवले गेले तेव्हा तिथल्या अभियांत्रिकांना खेळाचे प्रसारण कसे करावे, याचे मार्गदर्शनही मी केले,’’ असे बांदेकर सांगत होते.

‘‘खेळाच्या ओढीमुळेच क्रीडा स्पर्धाचे प्रसारण करण्यात कारकीर्द करण्याचे ठरवले. आतापर्यंत भारताचा विश्वविजय, एकदिवसीय क्रिकेटमधील सर्व द्विशतके, सचिनचा अखेरचा सामना. पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक यांचा पदक मिळवल्याचा आनंद मी ‘याची डोही, याची डोळा’ पाहिला आहे. या साऱ्या सुवर्णआठवणी शब्दांत वर्णता येणार नाहीत. जे मला या क्षेत्राने आणि खेळांनी दिले आहे, ते सारे अद्भुत, अविस्मरणीय असेच आहे,’’ असे बांदेकर म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradeep putharana and jayanta bandekar
First published on: 11-12-2016 at 02:32 IST