वृत्तसंस्था, लास वेगास
जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशकडून पारंपरिक आणि जलद प्रकारात पराभूत होणाऱ्या मॅग्नस कार्लसनवर आता भारताचा आणखी एक ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदकडून पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली आहे. ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’च्या लास वेगास टप्प्यात प्रज्ञानंदने विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेल्या कार्लसनवर अवघ्या ३९ चालींत सरशी साधत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रज्ञानंदने अप्रतिम कामगिरी करताना ‘विजेत्या’ खेळाडूंच्या गटात संयुक्त अग्रस्थान मिळवले. सात फेऱ्यांअंती प्रज्ञानंद, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि जावोखिर सिंदारोव यांचे समान ४.५ गुण होते. लेवॉन अरोनियन चार गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
कार्लसनने स्पर्धेची सुरुवात सलग विजयांसह केली होती. मात्र, तिसऱ्या फेरीत प्रज्ञानंदविरुद्ध झालेल्या पराभवातून सावरणे कार्लसनला अवघड गेले. पुढील फेरीत त्याला अमेरिकेच्या वेस्ली सोकडूनही हार पत्करावी लागली. त्यानंतर त्याला सलग दोन लढतींत बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या फेरीत विजय अनिवार्य असताना त्याने बिबिसारा असाउबायेवाला पराभूत केले. मात्र, त्यानंतरही त्याला ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळावे लागले. यात कार्लसनने अरोनियन याच्याविरुद्ध दोनही डावांत हार पत्करली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेरीस त्याला ‘पराभूत’ खेळाडूंच्या गटात स्थान मिळाले आणि तो जेतेपदाच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर गेला.
एरिगेसीचीही आगेकूच
दुसऱ्या गटातून ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. अडखळत्या सुरुवातीनंतर एरिगेसीला सूर गवसला. त्याचे आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचे समान चार गुण झाले. हिकारू नाकामुराने उत्कृष्ट खेळ करताना सात फेऱ्यांत सहा गुण मिळवत गटात अग्रस्थान पटकावले. हान्स निमन (४.५ गुण) दुसऱ्या स्थानी राहिला. ग्रँडमास्टर विदित गुजराथीची कामगिरी निराशाजनक ठरली. तो केवळ १.५ गुणांसह अखेरच्या स्थानी राहिला. आता उपांत्य फेरीत प्रज्ञानंदसमोर कारुआना, तर एरिगेसीसमोर अब्दुसत्तोरोवचे आव्हान असेल. अन्य दोन लढतींत अरोनियन आणि नाकामुरा, तर निमन आणि सिंदारोव आमनेसामने येतील.
‘फ्री-स्टाइल’ बुद्धिबळाला फिशर रॅपिड किंवा ‘चेस९६०’ म्हणूनही संबोधले जाते. यात पारंपरिक बुद्धिबळाचे सर्वच नियम पाळले जातात, अपवाद केवळ एका नियमाचा. या पद्धतीत डावाच्या सुरुवातीलाच मोहऱ्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीची असते. सामन्यास काही मिनिटे असताना मोहऱ्यांची मांडणी उघड केली जाते.
‘हेडफोन’चा वापर का?
बुद्धिबळाचा आता अधिक प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला जात असून याचाच एक भाग म्हणून सामन्यांच्या वेळी प्रेक्षकांना स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. मात्र, सामने सुरू असताना प्रेक्षकांनी आवाज केल्यास खेळाडूंचे लक्ष विचलित होण्याचा धोका असतो. याच कारणास्तव ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’च्या लास वेगास टप्प्यात खेळाडूंना आवश्यक वाटल्यास ‘हेडफोन’ वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे त्यांना आजूबाजूच्या आवाजापासून दूर राहून केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. कार्लसन आणि प्रज्ञानंद यांनीही खेळताना ‘हेडफोन’ घातले होते.
प्रज्ञानंदची चमक
पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनला १९ वर्षीय प्रज्ञानंद कायमच कडवी झुंज देतो. त्याने २०२३च्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रकारातही कार्लसनला नमवले होते. त्याआधी त्याने ऑनलाइन बुद्धिबळातही कार्लसनवर मात केली होती. आता फ्री-स्टाइल बुद्धिबळातही प्रज्ञानंदने अशीच किमया साधली आहे. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने सुरुवातीलाच पटावर वर्चस्व प्रस्थापित केले. अपेक्षेनुसार कार्लसनने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, प्रज्ञानंदने वैविध्यपूर्ण चाली रचत कार्लसनला गोंधळात टाकले. अखेर ३९व्या चालीअंती कार्लसनने हार मान्य केली.
‘फ्रीस्टाइल ग्रँडस्लॅम टूर’बाबत…
● टेनिसमधील चार ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या धर्तीवर ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याला ‘फिडे’चा अधिकृत दर्जा नाही, पण बुद्धिबळविश्वात स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
● ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’चे वर्षभरात विविध टप्पे होणार असून अखेरीस सर्वाधिक गुण असणारा बुद्धिबळपटू विजेता ठरेल. अमेरिकेच्या लास वेगास येथे सुरू असलेला हा स्पर्धेचा चौथा टप्पा आहे.
● यात १६ बुद्धिबळपटूंची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटांतील अव्वल चार बुद्धिबळपटूंना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले.
● ‘फ्री-स्टाइल ग्रँडस्लॅम टूर’च्या याआधी कार्ल्सरूह (जर्मनी) आणि पॅरिस येथील टप्प्यात कार्लसन विजेता ठरला होता. विसेनहॉस (जर्मनी) येथे झालेल्या टप्प्यात व्हिन्सेन्ट केमेरने बाजी मारली होती.
कार्लसनविरुद्धच्या विजयाने नक्कीच आनंदीत आहे. मला आता पारंपरिक डावापेक्षा फ्री-स्टाइल बुद्धिबळ खेळायला जास्त आवडते. आता सातत्य राखणे आवश्यक आहे. – आर. प्रज्ञानंद