सिंधू, श्रीकांत यांचीही आगेकूच; लक्ष्य पराभूत

बाली : भारताचा प्रतिभावान बॅडिमटनपटू एच. एस. प्रणॉयने गुरुवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रणॉयसह पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनीही विजयी घोडदौड कायम राखली. लक्ष्य सेनला मात्र दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत २९ वर्षीय बिगरमानांकित प्रणॉयने डेन्मार्कचा द्वितीय मानांकित विक्टर अ‍ॅक्सेलसनवर १४-२१, २१-१९, २१-१६ असा पिछाडीवरून विजय मिळवला. १ तास आणि ११ मिनिटांपर्यंत हा सामना रंगला. आता उपांत्यपूर्व लढतीत प्रणॉयची भारताच्याच श्रीकांतशी गाठ पडणार आहे. श्रीकांतने इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित जोनाथन ख्रिस्तीवर १३-२१, २१-१८, २१-१४ अशी सरशी साधली.

अन्य लढतीत, युवा लक्ष्यने जपानच्या अग्रमानांकित केंटो मोमोटाचा कडवा प्रतिकार केला. परंतु मोमोटाने २१-१३, २१-१९ अशा फरकाने हा सामना जिंकून लक्ष्यचे आव्हान संपुष्टात आणले. लक्ष्यने हायलो आणि डच बॅडिमटन स्पर्धेत अनुक्रमे उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत स्पेनच्या क्लारा अझुरमेंडीवर १७-२१, २१-७, २१-१२ अशी मात केली. पुढील फेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूसमोर टर्कीच्या नेलिशन यिग्तचे आव्हान असेल. सिंधूने २०१९च्या जागतिक अजिंक्यपदानंतर एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यातच सायना नेहवालने माघार घेतल्याने महिलांमध्ये सिंधूवरच भारताच्या आशा टिकून आहेत.

मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी यांना गाशा गुंडाळावा लागला. थायलंडच्या सुपक जोमकोह आणि सुपिसरा पेश्वरामन यांनी भारतीय जोडीला २१-१५, २१-२३, २१-१८ असे नमवले.