वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बुद्धिबळविश्वातील भारतीय खेळाडूंच्या वर्चस्वाचे कौतुक करतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडाक्षेत्रात आता आपला देश ‘परिवर्तनकारी बदलांच्या’ उंबरठ्यावर असल्याचेही नमूद केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना मुर्मू यांनी भारतीय बुद्धिबळपटूंचा विशेष उल्लेख केला.
गेल्या वर्षीअखेरीस १८ वर्षीय दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावले. तो आजवरचा सर्वांत युवा जगज्जेता ठरला. पाठोपाठ भारताच्या पुरुष आणि महिला संघाने ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला. तर गेल्याच महिन्यात नागपूरकर दिव्या देशमुखने महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. विशेष म्हणजे अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंतच झाली होती. यात १९ वर्षीय दिव्याने अनुभवी कोनेरू हम्पीला नमवले होते. अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी, आर. वैशाली यांसारख्या अन्य बुद्धिबळपटूंनीही विविध स्पर्धांत आपली चमक दाखवली आहे. याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
‘‘नवउमेदीने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करणारी आपली युवा पिढी क्रीडाक्षेत्रातही दर्जेदार कामगिरी करत आहे. बुद्धिबळ हे याचे उत्तम उदाहरण आहे. या खेळात भारताचे युवा खेळाडू आता जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवत आहेत. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या माध्यमातून भारताला जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून स्थापित करणारे परिवर्तनात्मक बदल आम्हाला अपेक्षित आहेत,’’ असे राष्ट्रपती मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या.
‘‘आपल्या मुली आपला अभिमान आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता दाखवत आहेत आणि याला खेळही अपवाद नाही. भारतातील एक १९ वर्षीय मुलगी (दिव्या देशमुख) आणि एक ३८ वर्षीय महिला (हम्पी) विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली. विविध पिढ्यांतील महिलांची जिद्द, चिकाटी आणि जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता याचे हे उदाहरण आहे,’’ असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले.