सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोमसह चार महिला आणि तीन पुरुष अशा एकूण सात बॉक्सिंगपटूंनी लॅबुआन बाजो (इंडोनेशिया) येथे झालेल्या प्रेसिडंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली आहे, तर दोघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मोनिका, जमुना बोरो, सिमरनजित कौर, अंकुश दहिया, नीरज स्वामी आणि अनंता चोपडे यांनी विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताला सर्वोत्तम संघाचा पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात आला.
महिलांमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँक्सचा ५-० असा पराभव केला आणि आगामी जागतिक अिजक्यपद स्पर्धेत आशा उंचावल्या आहेत. ४८ किलो गटात मोनिकाने इंडोनेशियाच्या एंडँगचा
५-० असा पाडाव केला. ५४ किलो गटात जमुनाने इटलीच्या गिऊलिया लॅमाग्नाचा ५-० असा धुव्वा उडवला. ६० किलो गटात सिमरनजितने इंडोनेशियाच्या हसानाह हुस्वातूनचा ४-० असा पाडाव केला.
पुरुषांमध्ये ६४ किलो गटात अंकुशने मकाऊच्या लेऊंग किन फाँगला ५-० असे नमवले. ५२ किलो गटात अनंताने अफगाणिस्तानच्या रहमान रामिशचा ५-० असा पराभव केला. ४९ किलो गटात नीरजने फिलिपाइन्सच्या मॅकाडो ज्यु. रॅमेलवर ४-१ असा विजय मिळवला. ५६ किलोमध्ये इंडोनेशियाच्या मँडगी जिलकडून ३-२ असा पराभव पत्करल्यामुळे गौरव भिदुरीला रौप्यपदक मिळाले. याचप्रमाणे इंडोनेशियाच्या समादा सपुत्राकडून हार पत्करल्यामुळे दिनेश डागरला उपविजेतेपद मिळाले.
मे महिन्यात झालेल्या इंडिया बॉक्सिंग स्पर्धेतही मेरीने सुवर्णपदक पटकावले होते. परंतु ऑलिम्पिक पात्रतेचे आव्हान पेलण्यासाठी तिने थायलंडला झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सामोरे जाताना सामन्यांचा सराव मिळावा, या हेतूने मेरीने या प्रतिष्ठेच्या प्रेसिडंट चषक स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षी दिल्लीमध्ये मेरीने तिच्या कारकीर्दीतील सहावे जागतिक सुवर्णपदक पटकावले होते. परंतु २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकरिता तिला रशियात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत संधी असेल. ही स्पर्धा ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत येकॅटरिनबर्ग येथे होणार आहे.