फलंदाजी खरे तर भारताचे बलस्थान, फलंदाजीच्या जोरावर भारताने आतापर्यंत बरेच सामने जिंकले आहेत. पण हीच फलंदाजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबरोबरच न्यूझीलंडमधील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात कच खाताना दिसली आणि एकही विजय पदरात पडला नाही. भारतीय फलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे, न्यूझीलंडमध्ये त्यांच्या धावाही होतील, पण त्यासाठी त्यांनी मनाचा दुबळेपणा झटकून टाकायला हवा. जर भारताच्या फलंदाजांनी न्यूनगंड बाळगला नाही तर वेगवान आणि चेंडू स्विंग होणाऱ्या गवताळ खेळपट्टीवर विजयाचे माप पदरात पडू शकते. बुधवारी रंगणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना भारतासाठी फलंदाजी ही एक डोकेदुखी असेल, पण त्याचे औषधही त्यांच्याकडेच आहे. दुसरीकडे पहिला सामना जिंकल्यावर दुसऱ्या सामन्यातही सातत्य राखण्यावर न्यूझीलंडचा भर असेल.
पहिल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा चाचपडत होता, तर शिखर धवनचे पाय हलत नव्हते. या दोघांनी गेल्या चार सामन्यांमध्ये सर्वाधिक सलामी दिली आहे ती १५ धावांची. भारतात शतकांच्या राशी उभारणाऱ्या या दोन्ही सलामीवीरांकडून संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा असेल. अजिंक्य रहाणेला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही, तर सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत असूनही तो संघात कसा, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. रवींद्र जडेजाने फलंदाजी ‘ऑप्शन’ला टाकल्याचेच जाणवते. तर धोनीलाही चांगला जम बसवण्यात अपयश येत आहे. विराट कोहली हे भारताचे एकमेव नाणे गेल्या सामन्यात खणखणीत वाजले होते. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताला विजयाची आस होती, पण अन्य फलंदाजांच्या कचखाऊपणामुळे सामना गमवावा लागला होता. पाठलाग करताना ११ शतके झळकावत कोहलीने संघाला विजय मिळवून दिला होता, पण १२वे शतक मात्र संघाला फळले नाही.
मोहम्मद शामीवगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी पहिल्या सामन्यात करता आली नाही. आर. अश्विन आणि इशांत शर्मा यांची गोलंदाजी प्रभावहीन वाटत होती. त्यामुळे भारताला गोलंदाजीचे पर्याय चाचपडून पाहण्याची ही चांगली संधी असेल.
न्यूझीलंडचा संघ चांगलाच समतोल असून चांगल्या फॉर्मात आहे. अष्टपैलू कोरे अँडरसन हा संघाला हुकमी एक्का ठरत आहे. त्याचबरोबर जेसी रायडर आणि रॉस टेलर हे अनुभवी फलंदाजही चांगल्या धावा करत आहेत. गोलंदाजीमध्ये मॅक्लेघन, साऊथी आणि अँडरसन हे त्रिकूट भेदक मारा करत आहे. पण यावेळी त्यांना अचूक मारा करणाऱ्या जायबंदी अॅडम मिन्लेची उणीव नक्कीच जाणवेल.
पहिला सामना जिंकलो असतो तर नक्कीच सकारात्मक भावनेबरोबरच मनोबलही उंचावले असते. पण या सामन्यातून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. आम्ही यापुढे अधिक जबाबदारीने फलंदाजी करू आणि त्यामुळे चांगला निकाल देऊ.
-विराट कोहली, भारताचा फलंदाज
मालिकेची सुरुवात चांगली झाली आहे. प्रत्येक विभागात आमच्याकडून सरस कामगिरी झाली. प्रत्येकाला आपल्या भूमिकेची जाणीव असून कामगिरीत सातत्य राखणे हेच आमचे ध्येय असेल. कारण कामगिरीत सातत्य राखले तर विजय हमखास आमचाच असेल.
-ब्रेंडन मॅकक्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, इश्वर पांडे, वरुण आरोन आणि अमित मिश्रा.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅकक्युलम (कर्णधार), कोरे अँडरसन, मार्टिन गप्तील, मिचेल मॅक्लेघन, नॅथन मॅकक्युलम, कायले मिल्स, जेम्स नीशम, ल्यूक राँची (यष्टीरक्षक), जेसी रायडर, टीम साऊथी, रॉस टेलर, केन विल्यम्सन, हमिश बेनेट.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर. वेळ : सकाळी ६.३० वा. पासून.