Jail Premier League Viral Video: भारतात सध्या आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. देशभरात नव्हे, तर जगभरात या स्पर्धेची चर्चा रंगते. मात्र, आयपीएल सुरू असताना आणखी एका क्रिकेट लीग स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा पाहिल्या असतील. पण कधी जेल प्रीमियर लीग स्पर्धा ऐकलं होतं का? क्वचितच ऐकलं असेल, कारण याआधी असं काही घडलंच नव्हतं. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला की, त्याला कायद्यानुसार शिक्षा दिली जाते. ही शिक्षा पूर्ण करण्यासाठी आरोपीला तुरूंगात ठेवलं जातं. काही आरोपी काही महिन्यांसाठी तुरूंगात शिक्षा भोगतात. तर काही आरोपींचं संपूर्ण आयुष्य तुरूंगात निघून जातं. आरोपी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहावे, म्हणून कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. मात्र, कैद्यांसाठी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन आणि ते सुद्धा कारागृहातच? हे तु्म्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात काही कैदी कारागृहात क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ मथुरातील कारागृहातील आहे. कैद्यांना दोन गटांमध्ये विभागून दोन संघ तयार करण्यात आले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा दमदार सामना रंगला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कैदी मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सामना झाल्यानंतर त्यांना सन्मानित देखील केलं जात आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ANI ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका यूझरने कमेंट करत लिहिले की,”खरी मजा तर हे लोकं करत आहेत.” तर आणखी एक यूझरने कमेंट करत लिहिले की,’जर कारागृहात अशी सोय असेल, मी देखील कारागृहात जायला तयार आहे.” तर आणखी एका युझरने लिहिले,” असं वाटतंय कारागृहात जावं लागेल.” हा झाला मजेचा भाग,पण हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.