Prithvi Shaw slams hundred in Buchi Babu tournament: पृथ्वी शॉ ने बूची बाबू स्पर्धेत महाराष्ट्रकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं आहे. पृथ्वीने मुंबईची साथ सोडत महाराष्ट्रकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये कसोटी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉची कारकीर्द मैदानावरील आणि संघातील त्याचं वर्तन याचबरोबर तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे जवळपास संपुष्टात आली. पृथ्वीने छत्तीसगडविरूद्ध सामन्यात १११ धावांची खेळी केल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.
छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावा केल्यानंतर महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉने पहिल्या डावाची सुरुवात करताना उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्राचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. भारतीय संघातून वगळण्यात आल्यापासून पृथ्वी शॉच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील तो अनसोल्ड राहिला. याशिवाय, तो दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघातही स्थान मिळवू शकला नाही.
पृथ्वी शॉची शून्यापासून पुन्हा सुरूवात, शतकानंतर काय म्हणाला?
त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याने नव्या सुरूवातीच्या दिशेने शतकी खेळी करत एक पाऊल टाकलं आहे. दरम्यान पृथ्वीने बूची बाबू स्पर्धेत खेळत असताना इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायला हरकत नाही, कारण मी माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. मी यशाच्या शिखरावर पोहोचलो, पुन्हा अपयशी झालो, त्यानंतर पुन्हा यशाची चव चाखली, त्यामुळे मला वाटतं सर्वकाही शक्य आहे.”
पृथ्वी पुढे म्हणाला, “मी खूप आत्मविश्वासू माणूस आहे, स्वतःवर, माझ्या कामाच्या नीतीवर मला विश्वास आहे. मला वाटतं की, हा हंगाम माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी खूप चांगला असणार आहे.”
पृथ्वी सोशल मीडियापासून राहतोय दूर
“मी काहीच बदललेलं नाही. मी फक्त मूळ गोष्टींकडे परतलो, त्या गोष्टी पुन्हा करू लागलो ज्या मी अंडर-१९ क्रिकेट खेळताना करत होतो आणि ज्यामुळे मला भारतीय संघात स्थान मिळालं. त्या सगळ्या गोष्टी पुन्हा करतोय, जास्त सराव, जिम, धावणें. या लहानसहान गोष्टी आहेत, पण महत्त्वाच्या आहेत. मी त्या १२-१३ वर्षांचा असल्यापासून हे करत आलो आहे,” असं पृथ्वी शॉने सांगितलं.
गेल्या तीन महिन्यांत पृथ्वीने ट्रेनरसह फिटनेसवर काम केलं आहे. पुढे पृथ्वी म्हणाला, “खरं सांगायचं तर सोशल मीडिया किंवा अशा प्रकारच्या गोष्टींपासून दूर राहतोय. आजकाल सोशल मीडिया खूप नकारात्मक झालंय. जेव्हा मी सोशल मीडियावर वापरत नाही, तेव्हा खूप शांत वाटतं.”
पृथ्वी शॉ ला त्याच्या कठिण काळात कोणत्या माजी किंवा सध्याच्या भारतीय खेळाडूने त्याच्याशी चर्चा केली किंवा भेट घेतली का? या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, “सगळं ठीक आहे. मला कोणाची सहानुभूती नको आहे. मी हे आधीही अनुभवलेलं आहे. मला माझ्या कुटुंबाचा आधार मिळाला आहे आणि माझे मित्रसुद्धा माझ्याबरोबर होते जेव्हा मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. त्यामुळे काही हरकत नाही. लोक आपापल्या कामात व्यस्त असतात, त्यांचं स्वतःचं कुटुंब असतं, त्यामुळे त्याने मला अजिबात त्रास झाला नाही. मी अशा टप्प्यात होतो जिथे सगळं काही मी एकटाच करत होतो आणि खरं सांगायचं तर ते माझ्यासाठी चांगलंच ठरलं.”