घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सची हार

नव्या खेळाडूंसह सर्वसमावेशकता प्राप्त झालेल्या यू मुंबा संघाने हैदराबादमधील गच्चीबाऊली इन्डोअर स्टेडियमवर झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या लढतीत बंगाल वॉरियर्सला २६-१८ असे नमवत यशस्वी ‘दक्षिणायन’ केले. सलामीच्या लढतीत तेलुगू टायटन्सची आघाडी मोडून काढत पाटणा पायरेट्सने ३५-३३ असा शानदार विजय मिळवला.

रिशांक देवाडिगाच्या भेदक चढाया व भक्कम बचावाच्या बळावर यू मुंबाने मध्यंतराला १६-९ अशी आघाडी घेतली. सातव्या मिनिटालाच लोण चढवत मुंबईने इरादे स्पष्ट केले होते. मध्यंतरानंतर सूरजीत (३), राकेश कुमार (४) यांनी एकापेक्षा एक सरस पकडी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या अनुप कुमारने बंगालच्या आघाडीपटूंना रोखले. बंगालचे भरवशाचे नितीन मदने आणि मोनू गोयत यांनी ११ चढायांत एकंदर दोनच गुणांची कमाई केली.

विनोद कुमारची पकड करत पाटण्याने पहिला गुण कमावला. राजेश मोंडलने यशस्वी चढाई केली. जसमीर सिंग गुलियाच्या रुपात तेलुगू टायटन्सने २-२ बरोबरी केली. टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने यशस्वी चढाई करताना एक गुण मिळवला. पाटण्याचा हुकमी एक्का प्रदीप नरवालची पकड करत टायटन्सने ४-५ अशी पिछाडी भरून काढली. सावध सुरुवातीनंतर पाटण्याने गती पकडली व ७-४ अशी आघाडी घेतली. टायटन्सच्या संदीप नरवालची पकड करताना पाटण्याच्या खेळाडूंना धसमुसळेपणा नडला आणि टायटन्सने ८-८ अशी बरोबरी केली. कर्णधार राहुल चौधरीच्या रुपात पाटण्याने १०-८ अशी आगेकूच केली. मग पाटण्याने १०-१० बरोबरी केली. प्रदीप नरवालची पकड करत टायटन्सने ११-१० अशी वाटचाल केली. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात खेळताना टायटन्स संघाचा आत्मविश्वास उंचावला. आधारस्तंभ असलेल्या राहुल चौधरीने पाटण्याच्या खेळाडूंना चकवा देत संघाला १२-१० आघाडी मिळवून दिली. पुढच्या मिनिटाला राजेश मोंडलची पकड करत त्यांनी १६-११ वाटचाल केली. दमदार चढाया आणि अचूक पकडी करत टायटन्स संघाने मध्यंतराला १९-१३ अशी स्थिती गाठली. विश्रांतीनंतर प्रदीप नरवाल (११), राजेश मोंडल (७) यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर पाटण्याने झपाटय़ाने पिछाडी भरून काढली. शेवटच्या तीन मिनिटांत झंझावाती खेळ करत पाटण्याने ३५-३३ अशी बाजी मारली.

आजचे सामने

बंगळुरू बुल्स वि. पुणेरी पलटण

तेलुगू टायटन्स वि. बंगाल वॉरियर्स

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी

 

*****************************

 

हॅमिल्टनला ‘नाटय़मय’ विजेतेपद

एएफपी, स्पिलबर्ग

गतविश्वविजेत्या लुइस हॅमिल्टन याने रविवारी ऑस्ट्रियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत ‘नाटय़मय’रीत्या जेतेपद पटकावले.

अंतिम टप्प्यात मर्सिडीजचा संघसहकारी निको रोसबर्ग याच्यासोबत झालेल्या टकरीनंतरही हॅमिल्टनने एक तास २७ मिनिटे व ३८.१०७ सेकंदांची वेळ नोंदवून अव्वल स्थानावर कब्जा केला. ५.७१९ सेकंदांनंतर रेड बुलच्या मॅक्स व्हेस्र्टाप्पेन याने शर्यत पूर्ण करत दुसरे, तर फेरारीच्या किमी रैकोनेने (६.०२४ सेकंद) तिसरे स्थान पटकावले. तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या हॅमिल्टनने पहिल्या क्रमांकावरून शर्यतीला सुरुवात केली, परंतु त्याला रोसबर्गने कडवे आव्हान दिले. अखेरच्या टप्प्यात हॅमिल्टन आणि रोसबर्ग यांच्या गाडीत टक्कर झाली आणि रोसबर्गला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.