प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात यजमान संघाचा घरच्या मैदानावर खराब कामगिरी करण्याचा सिलसिला सुरुच आहे. तामिळ थलायवाज पाठोपाठ हरयाणा स्टिलर्स संघालाही घरच्या मैदानावर सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आज झालेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने हरयाणाची झुंज 36-33 ने मोडून काढली. आतापर्यंत हरयाणाचा संघ घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये गुजरातविरुद्धचा सामना जिंकू शकली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या लढतीत बंगाल वॉरियर्स विजयी

जयपूरच्या संघाने केलेला अष्टपैलू खेळ हे त्यांच्या आजच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. पहिल्या सत्रात मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ हे 12-12 च्या गुणांनी बरोबरीत होते, मात्र दुसऱ्या सत्रात जयपूरच्या संघाने हरयाणाच्या गोटात खळबळ माजवली. नितीन रावल, दिपक हुडा, कर्णधार अनुप कुमार यांनी चढाईमध्ये तर संदीप धुल, मोहीत छिल्लर, याँग चँग को यांनी बचावात संघासाठी चांगल्या गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात जयपूरने हरयाणाच्या संघाला सर्वबाद करुन सामन्यात आघाडी घेतली. यानंतर जयपूरच्या संघाने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे हरयाणाच्या संघात चढाईमध्ये नवीनचा अपवाद वगळता एकही चढाईपटू आपली छाप पाडू शकला नाही. नवीनने अष्टपैलू खेळ करत 17 गुण मिळवले, मात्र त्याला मोनू गोयत, विकास कंडोला योग्य ती साथ देऊ शकले नाहीत. याचसोबत बचावफळीनेही आजच्या सामन्यात पुन्हा एकदा निराशा केली. शेवटच्या सत्रात हरयाणाच्या चढाईपटूंनी अखेरच्या काही मिनीटांमध्ये चढाईत काही गुण मिळवत जयपूरला चांगली टक्कर दिली. मात्र जयपूरच्या खेळाडूंनी सामन्यावरील आपली पकड ढिली होणार नाही याची काळजी घेत 36-33 च्या फरकाने सामना जिंकला.