प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली असून, हळूहळू ही स्पर्धा आपला वेग पकडत असून क्रीडारसिकांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र यंदाच्या हंगामात होत असलेल्या सुमार पंचगिरीवर अनेक खेळाडू आणि संघांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. सर्वात आधी तेलगू टायटन्सचा खेळाडू निलेश साळुंखेने बोनस पॉईंट न दिल्यामुळे पंचांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. आता गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात पंचांच्या काही निर्णयावर जयपूर पिंक पँथर्सचे प्रशिक्षक बलवान सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातमध्ये सुरु असलेल्या सामन्यांमध्ये, जयपूरच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात दोन्ही संघ हे तुल्यबळ होते, मात्र पंचांनी दिलेल्या काही निर्णयामुळे आम्ही सामना गमावला, असं बलवान सिंह म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या सत्रात जयपूरच्या कोर्टात चार खेळाडू शिल्लक होते. गुजरातच्या खेळाडूंनी केलेल्या रेडनंतर पंचांनी गुजरातला एक पॉईंट बहाल केला. मात्र गुजरातच्या खेळाडूंनी दोन पॉईंटची मागणी केली. सुरुवातीला पंचांनी गुजरातला दुसरा पॉईंट नाकारला, मात्र त्यानंतर आपला निर्णय मागे घेत गुजरातला लगेच दोन पॉईंट बहाल केले. त्यामुळे जयपूरच्या कोर्टमध्ये केवळ २ खेळाडू शिल्लक राहिले. पंचांनी घातलेल्या या गोंधळामुळे प्रशिक्षक बलवान सिंह चांगलेच नाराज झाले होते. या निर्णयाचा आम्हाला फटका बसला. गुजरातच्या खेळाडूंनी रिव्ह्यूची मागणी केलेली नसताता पंचांनी रिव्ह्यू देण्याचं कारण काय होतं? सुरुवातीला पंचांनी घेतलेला निर्णय योग्य होता, मात्र नंतर मैदानात उडालेल्या गोंधळामुळे त्यांनी गुजरातला एक पॉईंट जास्तीचा बहाल केला. हाच पॉईंट आमच्यासाठी सात पॉईंटच्या बरोबरीचा ठरला.

अवश्य वाचा – मी तुमचं काय घोडं मारलंय? निलेश साळुंखेचा पंचांना सवाल

मात्र गुजरातचे प्रशिक्षक मनप्रीत सिंह यांनी या निर्णयावर सावध प्रतिक्रीया दिलेली आहे. प्रशिक्षकांना काय वाटतं याला फार महत्व नाही. पंचांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, त्यामुळे या विषयी मला फार काही भाष्य करायचं नाही. घरच्या मैदानात गुजरातचा संघ चांगली कामगिरी करतोय, त्यामुळे आगामी काळात अशीच कामगिरी करत राहण्याकडे आमचा कल असेल असं म्हणत मनप्रीत सिंह यांनी या प्रकरणी अधिक भाष्य करण्याचं टाळलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 jaipur pink panthers coach not happy with referee decision
First published on: 14-08-2017 at 21:04 IST