क्रिकेट हा भारतीयांसाठी एका धर्माप्रमाणे आहे. कोणत्याही संघाविरुद्ध भारतीय संघाचा सामना असो, क्रिकेटचे चाहते टिव्हीसमोर बसून सामना बघणं काही सोडतं नाही. त्यामुळे भारतात क्रिकेट सोडून इतर खेळांना कुठलाच वाव नाही अशी ओरड अनेक वर्ष अन्य क्रीडाक्षेत्रातले दिग्गज करत होते. मात्र हे समीकरण आता बदलायला लागलं आहे. हळूहळू भारताच्या मातीतला खेळ आता क्रिकेटची जागा घेत आहे. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाने आता संपूर्ण भारतीयांवर आपलं गारुड केलं असून, नुकत्याची हाती आलेल्या अधिकृत आकडेवारीनूसार क्रिकेटला मागे टाकत कबड्डी हा भारतातला सर्वाधीक पाहिला जाणारा खेळ ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘BARC’ च्या आकडेवारीनूसार प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या मिळवली आहे. ‘बार्क’ने दिलेल्या आकडेवारीनूसार ३२ व्या आठवड्यात, प्रो-कबड्डीचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीला ३१ कोटी ६ लाख एवढी प्रेक्षकसंख्या मिळाली. प्रो-कबड्डीचं इंग्रजीमधून प्रक्षेपण करणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स फर्स्ट’ या वाहिनीला अंदाजे २० कोटी ६ लाख तर हिंदीतून प्रेक्षपण करणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स १’ वाहिनीला १० कोटी ९ लाखांची प्रेक्षकसंख्या मिळालेली आहे.

अवश्य वाचा – कबड्डीला क्रिकेटपेक्षा मोठं करायचंय – अनुप कुमार

प्रो-कबड्डीच्या तुलनेत भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला प्रेक्षकांनी अत्यल्प प्रतिसाद दिलेला आहे. अवघ्या ७ कोटी ९० लाख प्रेक्षकांनी भारत विरुद्ध श्रीलंका मालिका पाहण्याला आपली पसंती दर्शवली आहे. याव्यतिरीक्त बार्कच्या आकडेवारीनूसार देशात सर्वाधीक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला पहिल्या ५ जणांच्या यादीतही स्थान मिळू शकलेलं नाहीये. प्रो-कबड्डीशी संबंधीत कार्यक्रमांना पहिल्या ५ जणांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

‘बार्क’ने दिलेल्या आकडेवारीनूसार काही महत्वाच्या घडामोडी –

  • ११ ऑगस्ट रोजी गुजरात विरुद्ध यू मुम्बा संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्याला ४ कोटी ५० लाख प्रेक्षकसंख्या मिळाली. याचसोबत अहमदाबादमध्ये खेळवल्या गेलेल्या एकाही सामन्याला ४ कोटींपेक्षा कमी प्रेक्षकसंख्या मिळालेली नाहीये.
  • १० ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स संघात खेळवल्या गेलेल्या सामन्याला तब्बल ५ कोटींची प्रेक्षकसंख्या मिळालेली आहे.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला सुरुवातीला काही क्रीडा समिक्षकांनी या पर्वाला किती प्रतिसाद मिळेल याविषयी शंका निर्माण केली होती. मात्र यंदाच्या पर्वात नवीन खेळाडूंना मिळालेली संधी, त्यात ४ नवीन संघांनी केलेली आश्वासक कामगिरी यामुळे प्रो-कबड्डीने अजुनही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम राखलंय असंच म्हणावं लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 overtakes ind vs sl cricket series in terms of viewership no place for cricket in top 5 sporting events
First published on: 22-08-2017 at 14:58 IST