बॉक्सिंगमध्ये भारत हा आशियाई खंडातील अग्रगण्य देशांपैकी एक देश असून, तेथे व्यावसायिक लीग स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करू, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) अध्यक्ष डॉ. चिंग कुओ वु यांनी सांगितले.
‘‘भारत, उजबेकिस्तान, चीन, थायलंड, मंगोलिया, कझाकिस्तान आदी देशांमध्ये बॉक्सिंगची शानदार परंपरा आहे. या देशांमधील खेळाडूंच्या विकासाकरिता आमची संघटना सदैव मदत करण्यास तयार आहे,’’ असे चिंग यांनी सांगितले.
भारताच्या तीन खेळाडूंनी बँकॉकला सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील उपान्त्य फेरी निश्चित करीत जागतिक स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. जागतिक स्पर्धेला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीचा दर्जा असल्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.
‘‘व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारत ही उत्तम बाजारपेठ आहे, हे लक्षात घेऊन आम्ही हौशी खेळाडूंना भाग घेता येईल अशी व्यावसायिक स्तरावरील लीग आयोजित केली जाईल. भारतामधील वातावरण बॉक्सिंग खेळासाठी अतिशय पोषक आहे. तेथे या लीगला प्रेक्षकांचा व प्रायोजकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे,’’ असे चिंग म्हणाले.