India vs Pakistan, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील सुरूवातीचे काही सामने एकतर्फी झाले आहेत. भारत- पाकिस्तान सामना सोडला, तर इतर सामन्याची हवी तितकी चर्चा झालेली नाही. जेव्हा जेव्हा भारत- पाकिस्तान सामना होतो, तेव्हा क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पण यावेळी क्रिकेट चाहते दोन गटात विभागले गेले आहेत. एका गटाने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरा गट भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी हा सामना पाहणार आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतोय की, भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानसोबत का खेळत आहे?

भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, की क्रिकेट चाहत्यांची सामन्याची तिकिटं खरेदी करण्यासाठी एकच गर्दी होते. काही मिनिटात तिकिटं सोल्टआऊट होतात. तर ज्या शहरात क्रिकेटचे सामने आहेत, त्या शहरातील हॉटेलच्या किंमती गगनाला भिडतात. पण यावेळी स्डँड रिकामे आणि तिकीट खरेदी करण्यासाठीही गर्दी झालेली नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे, पाकिस्तानकडून पहलगाममध्ये करण्यात आलेला हल्ला. या हल्ल्यात भारतातील निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे देशभक्ती की क्रिकेट?असा प्रश्न उपस्थित होत असताना, बहुतांश भारतीय नागरीक देशभक्तीच्या बाजूने उभे राहिले आहेत. क्रिकेट हे देशापेक्षा मोठं नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे.

याआधी इंग्लंडमध्ये झालेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंनी सामना सुरू होण्याआधी पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता. यासह वरिष्ठ खेळाडूंनी दाखवून दिलं होतं की, आमच्यासाठी देश आधी आहे आणि क्रिकेट नंतर आहे. मग यावेळी बीसीसीआयने असा निर्णय का घेतला नाही?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जुलै महिन्यात आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. भारत- पाकिस्तान सामना पाहून अनेकांनी या सामन्याला विरोध केला. तेव्हाही #BoycottINDvsPAK सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते.

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार अशी चर्चा रंगली होती. पण त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमनेसामने आलेले नाहीत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येत असतात. भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळू शकतात. पण दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळणार नाहीत. यावरून हे स्पष्ट झालं की, भारत- पाकिस्तान सामना होणार.

भारतीय संघ पाकिस्तानसोबत का खेळत आहे?

भारत आणि पाकिस्तान सामना हा सर्वात जास्त पाहिला जाणारा क्रिकेट सामना आहे. आयसीसी आणि एसीसीला माहित आहे की, स्पर्धा यशस्वी करायची असेल तर भारत- पाकिस्तान सामना होणं महत्वाचं आहे. पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर फारसा फरक पडणार नाही. कारण भारतीय संघाला समर्थन करणारे चाहते जगभरात आहे. पण जर भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास नकार दिला किंवा स्पर्धेतून माघार घेतली, तर याचा आयसीसी आणि एसीसीला आर्थिक फटका बसू शकतो.

भारत- पाकिस्तान सामन्यामुळे टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. जाहीरांतीचे स्लॉट हे प्रीमियम दराने खरेदी केले जातात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत टीव्हीवर तब्बल २६ अब्ज मिनिटे पाहण्याची विक्रमी वेळ नोंदवली गेली होती. ही वेळे २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील वेळेपेक्षाही जास्त होती. जर भारत- पाकिस्तान सामना झाला नाही, तर महसूल गोळा होणार नाही.