भारतामधील मॅरेथॉन शर्यतींवर सतत आपली मोहोर नोंदविणाऱ्या केनिया व इथिओपिया या देशांच्या खेळाडूंमध्येच रविवारी येथील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत चुरस अपेक्षित आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या या शर्यतीमधील मुख्य मॅरेथॉन, पुरुष व महिलांची अर्धमॅरेथॉनमध्ये दीडशे परदेशी खेळाडूंनी भाग घेतला आहे. त्यामध्ये केनिया व इथिओपिया यांच्या खेळाडूंचा अधिकाधिक समावेश आहे. मुख्य मॅरेथॉनच्या विजेतेपदासाठी अग्रमानांकित जोसेफ किपकोच या केनियाच्या धावपटूपुढे येशिगेला बेकेले, रोबेल आलेमयेह्य़ु जेमेल एडम, एडे चिमासा (इथिओपिया) यांचे आव्हान असणार आहे. जोसेफचा सहकारी बेंजामिन सेरेम याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये लेमा तादिसी, लेउलेकल बेले, असरत क्लासिक या तीनही इथिओपियांच्याच खेळाडूंना संभाव्य विजेते मानले जात आहे. पहिल्या पंधरा मानांकित खेळाडूंमध्ये चौदा खेळाडू इथिओपियाचेच आहेत. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये इथिओपियाची एगरेर मकोनेन हिला संभाव्य विजेती मानली जात आहे. तिला एटाफेराहू तेम्सेन, टेफेरा एडेन्यु (इथिओपिया), जोसेफाईन किमुयु, नॅन्सी वाम्बुआ (केनिया) यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
 खंडुजीबाबा चौक (लकडी पूल) येथे पहाटे ५-४५ वाजता मुख्य मॅरेथॉन शर्यतीस प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ६-१० वाजता अर्धमॅरेथॉन, ६-४५ वाजता दहा किलोमीटर, ८ वाजता व्हीलचेअर, चॅरिटी दौड व कनिष्ठ गटाच्या शर्यती सोडण्यात येतील. मुख्य शर्यत लक्ष्मी रस्ता, भवानी पेठ, सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान, महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, विमानतळ रस्ता, येरवडा, आळंदी रस्ता, खडकी, औंध रस्ता, बाणेर, पुणे विद्यापीठ, अशोकनगर, फग्र्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्ता या मार्गाने नेहरु स्टेडियमवर संपणार आहे.