लांब पल्ल्याच्या शर्यतीसाठी अनुकूल वातावरणात व तुल्यबळ स्पर्धकांच्या सहभागात केनिया व इथिओपियाचे धावपटू येथे रविवारी होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. ही शर्यत रविवारी सकाळी ७ वाजता सुरू होत आहे.
शर्यतीत सहभागी झालेल्या आफ्रिकन धावपटूंनी शनिवारी सकाळी शर्यतीच्या मार्गावर सराव केला. बोचऱ्या थंडी व धुके अशा वातावरणात त्यांनी एकत्रित सराव करीत शर्यतीच्या मार्गाचा अंदाज घेतला. सर्वसाधारणपणे शर्यतीच्या २० ते २५ किलोमीटपर्यंत आफ्रिकन धावपटू एका जथ्यात धावतात व त्यांच्यामधील एक दोन खेळाडू हळूहळू वेग वाढवित आघाडी घेतात असाच अनुभव आजपर्यंत या शर्यतीत पहावयास मिळाला आहे. सरावानंतर या आफ्रिकन खेळाडूंचे प्रशिक्षक पॉल मुटवाई यांनी रविवारची शर्यत हेच खेळाडू गाजवतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
ही शर्यत दोन तास १२ मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणाऱ्या खेळाडूकरिता एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक संयोजन समितीने जाहीर केले आहे. हे बक्षीस जिंकण्यासाठी भारतीय धावपटू कसोशीने प्रयत्न करतील.  महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत हिच्यावर भारताची भिस्त आहे. तिने कनिष्ठ गटाच्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. राष्ट्रकुल विजेती कविता राऊत हिने २१ किलोमीटर शर्यतीत एक तास १२ मिनिटे ही स्वत:ची सर्वोत्तम वेळ नोंदविली आहे. या शर्यतीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून सकाळी ७ ते १०-३० या वेळेत केले जाणार आहे. तसेच आकाशवाणीवरूनही थेट समालोचन होणार आहे.