कुमार गट राज्य हॉकी स्पर्धेत सांगली संघ उपविजेता
राज्य व जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुमार गटाच्या हॉकी स्पर्धेत पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने विजेतेपदाचा करंडक पटकावला. सांगली जिल्ह्य़ाचा संघ स्पर्धेतील उपविजेता ठरला. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पुणे जिल्हा संघ झाला. अकोले संघ चौथ्या स्थानावर राहिला.
नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी सायंकाळी स्पर्धेचा समारोप झाला. विजेतेपदासाठी क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध सांगली संघात लढत झाली. क्रीडा प्रबोधिनी संघाने १-० फरकाने विजय संपादन केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. चाळिसाव्या मिनिटाला क्रीडा प्रबोधिनीच्या व्यंकटेश केंचेने विजयी गोल नोंदवला. तिसऱ्या स्थानासाठी पुणे विरुद्ध अकोले संघात लढत झाली. पुण्याने ६-१ अशी एकतर्फी मात केली. पुणे संघाच्या पवन रसाळे याने दोन तर अथर्व कांबळे, सुफियान शेख, सुहास अद्दल्लु, नवज्योत रंधवा यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर अकोल्याचा एकमेव गोल विवेक कनोजिया याने टोलवला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात सांगलीने अकोल्याचा २-० असा पराभव केला. सांगलीच्या विठ्ठल तेली व रत्नराज लोंढे यांनी गोल नोंदवले. दुसऱ्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध पुणे सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही, त्यामुळे सामना टायब्रकेरमध्ये गेला. क्रीडा प्रबोधिनीने पुण्यावर ४-२ अशी मात केली. क्रीडा प्रबोधिनीकडून व्यंकटेश केंचे, प्रणव जाधव, रोहन पाटील व सुनील राठोड यांनी तर पुणे संघाकडून हर्ष परमार व शेख सुफियान यांनी गोल नोंदवले.