तेलुगू टायटन्सवर सहज विजय; दिल्ली-जयपूर यांच्यातील लढत बरोबरीत

स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटणचा कर्णधार मनजीत चिल्लरने आपल्या खास रणनीतीसह सामना आणि चाहत्यांची मनेही जिंकली. या संपूर्ण सामन्यात मनजीतनेच साऱ्यांचे लक्ष वेधले. नेत्रदीपक पकडी, दमदार चढाया आणि चाणाक्ष नेतृत्व या त्रिसूत्रीच्या जोरावर त्याने पुणेरी पलटणच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुण्याने या सामन्यात तेलुगू टायटन्सवर ४१-२४ असा विजय मिळवत ३७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

सामन्यात सुरुवातीपासूनच पुण्याचे वर्चस्व राखले. सातव्या मिनिटालाच पुण्याने तेलुगूवर पहिला लोण चढवत १०-० अशी आघाडी घेतली होती. १७व्या मिनिटाला राहुलची अप्रतिम पकड पुण्याकडून पाहायला मिळाली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत पुण्याने २१-६ अशी दमदार आघाडी घेतली होती. मध्यंतराच्या दोन मिनिटांनंतरच पुण्याने तेलुगूवर दुसरा लोण चढवत २५-६ अशी मोठी आघाडी मिळवली. मनजीतने यावेळी तेलुगूचा कर्णधार राहुलच्या चढाईची धार बोथट केली. त्याच्या १४ चढायांपैकी फक्त चारच यशस्वी ठरू शकल्या. दुसरीकडे मनजीतने आठ पकडींसह एकूण ११ गुणांची कमाई केली.

दुसऱ्या लोणनंतर तेलुगूचा कर्णधार राहुलचा उत्साह मावळल्यासारखा दिसत होता. दुसरीकडे मनजीत आपल्या रणनीतीची चोख अमंलबजावणी करताना दिसला. ही लढत दोन्ही संघांच्या मनोवृत्तीमध्ये पाहायला मिळाली आणि यामध्ये मनजीतने बाजी मारली.

यजमान दबंग दिल्ली व जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामना २१-२१ असा बरोबरीत सुटला. मध्यंतराच्यावेळी दिल्लीकडे ९-७ अशी फक्त दोन गुणांची आघाडी होती. ३७व्या मिनिटाला रणसिंगने एका चढाईत ३ गुण मिळवले.

आजचे सामने

पुणेरी पलटण वि. बंगळुरू बुल्स

दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरियर्स

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३ वाहिन्यांवर.