गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील विजयी घोडदौड कायम राखत मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या एच. एस. प्रणॉयला मात्र पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदकाला गवसणी घालणाऱ्या थायलंडच्या बुसानन ओग्बूरुंगपन हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित सिंधूने आठव्या मानांकित बुसाननचा २१-१४, २१-१५ असा पाडाव करत तिच्याविरुद्ध ४-० अशी विजयाची मालिका कायम राखली. प्रणॉयने अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी कडवी झुंज दिली खरी, पण त्याला एक तास रंगलेल्या या सामन्यात हाँगकाँगच्या विंग कि वाँग याच्याकडून १६-२१, २१-१६, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.
बुसानन हिने पहिल्या गेममध्ये ५-२ अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण आणले. मात्र सिंधूने त्यानंतर वर्चस्व गाजवत १३-९ अशी आघाडी घेतली. तिने बुसाननला डोके वर काढण्याची संधी न देता पहिला गेम खिशात टाकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू ५-१ अशा आघाडीवर होती. त्यानंतर बुसाननने अप्रतिम फटके लगावत ८-८ आणि नंतर १२-१२ अशी बरोबरी साधली. सिंधूनेही आक्रमक खेळ करत तिचे फटके परतवून लावले. १९-१५ अशा स्थितीत बुसाननचे दोन फटके जाळ्यावर आदळले, त्यामुळे सिंधूने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. सिंधूला अंतिम फेरीत कोरियाच्या किम ह्य़ो मिन हिच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2014 रोजी प्रकाशित
अंतिम फेरीत सिंधूची धडक
गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील विजयी घोडदौड कायम राखत मकाऊ ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

First published on: 30-11-2014 at 08:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu enters semifinals of macau open