भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला नुकतेच सलग दोन स्पर्धांमध्ये निर्णायक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आधी झालेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या हे बिन्गजिओ हिने तिला २१-१४, २१-१५ असे सरळ गेममध्ये नमवले. तर पाठोपाठ थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूला जपानच्या नोझुमी ओकुहाराने २१-१५, २१-१८ असे पराभूत केले.

सिंधूचा सलग दोन स्पर्धांमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर सिंधूवर काही अंशी टीका झाली. तसेच तिलाही आपला पराभव काहीसा जिव्हारी लागला. त्यामुळे आता नजीकच्या काळात होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धांत चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने सिंधूने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की ३ आठवड्यानंतर अखेर मी घरी परतले. स्पर्धेतील निकालांमुळे मला फारसा आनंद झालेला नाही, पण यातून मला खूप काही शिकायला मिळाले. काही वेळा आपण जिंकतो, तर काही वेळा पराभूत होतो. निकाल काहीही असला तरी मला माझ्या चुकांतून धडा घेऊन दमदार पुनरागमन करायचे आहे. सध्या मी घरी परतली आहे त्यामुळे थोडी विश्रांती घेणार आहे. पण त्यानंतर मात्र वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी मला सज्ज व्हायचे आहे आणि म्हणूनच माझ्या चुकांतून बोध घेण्याचा तिने निर्णय केला आहे.

याशिवाय तिला भरभरून पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचेही सिंधूने आभार मानले.