Badminton World Championships PV Sindhu: भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली आहे. सहाव्यांदा पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले आहे. महिला एकल उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या पुत्री वर्दानीकडून तिला पराभव सहन करावा लागला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या वर्दानीने सिंधूचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत पीव्ही सिंधू १५ व्या स्थानी आहे. आज झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधूने पहिल्या सेटमध्ये धीम्या गतीने खेळ सुरू केला होता. १४-२१ ने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने चांगली पकड मिळवली. या सेटमध्ये २१-१३ ने वर्दानीवर मात केली. मात्र अंतिम तिसऱ्या सेटमध्ये वर्दानीने पुनरागमन करत १६-२१ ने विजय प्राप्त केला.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूने जगातील दुसऱ्या क्रमाकांची खेळाडू चीनच्या वांग झीला २१-१९, २१-१५ ने नमवत बीडब्लूएफच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. बासेलमध्ये २०१९ ला जागतिक जेतेपद जिंकणाऱ्या आणि १५व्या स्थानी असलेल्या सिंधूला उपउपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवण्यास ४८ मिनिटांचा वेळ लागला होता.

उपउपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या वांग झी यी विरोधात खेळताना सिंधूने सामन्याला चांगली सुरुवात केली. वेगवान स्मॅश आणि नेटजवळील खेळाच्या जोरावर सिंधूने गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली. मात्र, गेमच्या दुसऱ्या टप्प्यात वांगने खेळ उंचावत गेम १९-१९ असा बरोबरीत आणला. मात्र, सिंधूने संयमाने खेळ करीत पहिला गेम जिंकत आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने दबाव कायम राखताना मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी मिळवली. यानंतर ५७ फटक्यांच्या रॅलीत तिचा कस लागला. मात्र, सिंधूने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला व सामन्यात विजय नोंदवला.

सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी, वांग यिहान (२०१३), वांग शिक्सियन (२०१४), ली शुरुई (२०१५), सुन यू (२०१७) आणि चेन युफेई (२०१७ आणि २०१९) या चीनच्या खेळाडूंना पराभूत केले होते.