एखाद्या खेळाडूच्या जबरदस्त कामगिरीमुळे खेळाला प्रसिद्धी मिळायला सुरुवात होते खरी, पण त्या खेळाडूची कामगिरी रसातळाला जायला लागल्यावर खेळाची प्रसिद्धीही कमी व्हायला लागते. यावेळी खेळाला गरज असते ती नव्या ताऱ्याची, असाच एक तारा सध्या बॅडमिंटनच्या क्षितिजावर स्थिरावत असून खेळाला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची लाडकी ‘फुलराणी’ सायना नेहवालवर फॉर्म रुसल्यानंतर भारतीय बॅडमिंटनचे काय होणार, हा प्रश्न बऱ्याच जणांच्या ओठांवर होता, पण या प्रश्नाचे चोख उत्तर उद्योन्मुख बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर दिले आहे. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिच्यावर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आणि भारतीयांची मान सिंधूच्या गर्वाने उंचावली गेली. या वर्षांतील सिंधूचे हे दुसरे विजेतेपद आहे. प्रकाश पदुकोण यांनी १९८३ साली या स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली होती, त्यानंतर सिंधूने एकेरीमध्ये स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावत ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.
अव्वल मानांकित सिंधूने मिशेलवर अवघ्या ३७ मिनिटांमध्ये धुव्वा उडवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ करत सातव्या मानांकित मिशेलला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. सिंधूने अंतिम फेरीत मिशेलवर २१-१५, २१-१२ असा सफाईदार विजय मिळवत एक विजयाध्याय लिहिला. हे सिंधूचे वर्षभरातील दुसरे जेतेपद असून यापूर्वी मे महिन्यामध्ये तिने मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीच्या जोरावरच सिंधूने अर्जुन पुरस्कारालाही गवसणी घातली होती.
सामन्याची पहिली दोन मिनिटे सिंधूनेच गाजवली. पहिल्या दोन मिनिटांमध्ये सिंधूने ७-० अशी निर्विवाद आघाडी घेत मिशेलला नेस्तनाबूत करण्याचा पाया रचला. मिशेलला या सामन्यात पहिल्या गुणासाठी तिसऱ्या मिनिटाची वाट पाहावी लागली. एका बाजूने जोरदार हल्ले सिंधू करतच राहिली आणि मिशेलला तिने कुरघोडी करण्याची एकही संधी दिली नाही. पण तिसऱ्या मिनिटाला पहिला गुण कमावणाऱ्या मिशेलने सिंधूच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच या दोघींमध्ये तीन गुणांचा (९-६) फरक होता. मिशेल गुणांची कमाई करत जवळपास येत असल्याचा सुगावा लागल्यावर सिंधू अधिकच आक्रमक झाली आणि १६ व्या मिनिटाला तिने पहिला गेम २१-१५ असा सहजपणे जिंकला.
पहिला गेम गमावल्यावर मिशेलसाठी दुसरा गेम निर्णायक होता, कारण हा गेम जिंकून तिला सामन्यात बरोबरी करता आली असती. त्यामुळे दुसऱ्या गेममध्ये तिने सिंधूला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दोन्हीकडमून जोरदार फटके, नजाकतभरे ‘ड्राप्स’ आणि चपळ खेळ पाहायला मिळाला. एकीकडून सिंधू जोरदार आक्रमण करत होती, तर दुसरीकडे मिशेल नेट्सजवळून चेंडू अलगदपणे सिंधूकडे ढकलत होती.
दुसऱ्या गेमच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये ५-५ अशी बरोबरी झाली आणि गेम जबरदस्त रंगणार असे वाटायला लागले. पण विजयाचा निर्धार करून कोर्टवर उतरलेल्या सिंधूला हे मान्यच नव्हते, तिला एकहाती निर्विवादपणे सामना जिंकायचा होता आणि हेच तिच्या खेळाकडून यावेळी पाहायला मिळाले. जोरकस फटक्यांबरोबर अप्रतिम ऊर्जेचा वापर करत सिंधूने मिशेलला नतमस्तक होण्यास भाग पाडले. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे मिशेलला चकवत आणि दमवत सिंधूने ११-६ अशी चांगली आघाडी मिळवली. या आघाडीनंतर सिंधूचे मनोबल कमालीचे उंचावलेले पाहायला मिळाले आणि याचे रूपांतर गुणांमध्ये झाले. दुसऱ्या गेममध्ये मिशेलला २१-१२ असे पराभूत करत सिंधूने विजयासह जेतेपदाला गवसणी घातली.
आम्ही सिंधूच्या खेळातील वेगाला महत्त्व देऊन तो वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी सराव करताना भावनांवर नियंत्रण कसे ठेवता येईल, हेदेखील आम्ही पाहिले. या साऱ्या गोष्टींचा अवलंब मकाऊमध्ये करता आला आणि त्याचेच फळ आम्हाला मिळाले.
-पुलेला गोपिचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक
आम्हाला या विजेतेपदामुळे अतीव आनंद झाला आहे. हे वर्ष सिंधूसाठी फार चांगले आहे. मलेशियानंतर ही स्पर्धा जिंकली, विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. प्रशिक्षक गोपिचंद तिच्या खेळावर मेहमत घेत असून यापुढेही अशीच चांगली कामगिरी तिच्याकडून होत राहील, हीच आशा आहे.
पी.व्ही. रामण्णा, सिंधूचे वडिल.
उपांत्य फेरीत चीनच्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर ही स्पर्धा मीच जिंकणार, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये होता. जर मी चुका केल्या नाहीत, तर मी जेतेपद पटकावेन हे मला माहिती होते.
– पी.व्ही.सिंधू, भारताची युवा बॅडमिंटनपटू