नवी दिल्ली : इशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात साकारलेल्या शानदार द्विशतकानंतर अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या भारतीय एकदिवसीय संघातील स्थानाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. ३७ वर्षीय धवनला गेल्या काही काळात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे नव्या निवड समितीकडून धवनच्या भविष्याबाबत चर्चा केली जाणे अपेक्षित आहे. भारताच्या वरिष्ठ निवड समितीची लवकरच नेमणूक होणे अपेक्षित आहे.
डावखुऱ्या धवनला गेल्या नऊपैकी आठ एकदिवसीय सामन्यांत धावांसाठी झगडावे लागले आहे. तो सहा वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे, तर दोन वेळा त्याला ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. तसेच पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्याला आक्रमक शैलीत खेळ करण्यात अपयश आले आहे. याचा भारतीय संघाला फटका बसतो आहे. त्यातच किशन आणि शुभमन गिल यांसारख्या युवा सलामीवीरांचे पर्याय भारताकडे उपलब्ध असल्याने धवनवर भारतीय संघातील स्थान टिकवण्यासाठी दडपण आहे.
पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यादृष्टीने भारताला आता संघबांधणीला सुरुवात करावी लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे समजते. या बैठकीत खेळाडू व संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. तसेच भविष्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जातील.
‘‘नव्या निवड समितीची नेमणूक झाल्यानंतरच धवनच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचीही खेळाडूंबाबत मते असतील. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
धवनला जून २०१९ पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. तसेच त्याची धावगतीही (स्ट्राइक रेट) कमी होत चालली आहे. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी धवन १००हून अधिकच्या धावगतीने धावा करत होता, मात्र या वर्षी त्याने केवळ ७५च्या धावगतीने धावा केल्या आहेत.
किशनने बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १३१ चेंडूंत २१० धावा फटकावल्या. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्यातच धवनप्रमाणेच किशनही डावखुरा फलंदाज आहे. शुभमन गिलनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि नव्या निवड समितीला संघनिवडीबाबत काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत.
एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांसाठी वेगळे संघ?
भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ३ जानेवारी ते १ फेब्रुवारी, या २९ दिवसांच्या कालावधीत भारतीय संघ १२ मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. भारताचे श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी तीन एकदिवसीय व तीन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत. हे सामने १२ विविध शहरांत होणार असल्याने खेळाडूंना बराच प्रवासही करावा लागेल. त्यामुळे खेळाडूंना थकवा जाणवू नये यासाठी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांसाठी वेगळे संघ निवडले जाण्याची दाट शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेत प्रमुख खेळाडूंचा सहभाग असेल, तर ट्वेन्टी-२० मालिकांसाठी हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंना संधी मिळू शकेल.