NZ vs ZIM Record: न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडने ३ गडी बाद ६०१ धावा केल्या आहेत. दरम्यान न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना रचिन रविंद्र, हेनरी निकोलस आणि डेवोन कॉन्वे या तिघांनी १५०-१५० धावांची खेळी केली. यासह या तिघांनी ३९ वर्षानंतर मोठा विक्रम मोडून काढला आहे.
याआधी १९३८ मध्ये फलंदाजी करताना इंग्लंडच्या ३ फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९८६ मध्ये भारतीय संघातील ३ फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात १५०-१५० धावांची खेळी केली होती.
न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमदार फलंदाजी
या सामन्यात फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. रचिन रविंद्र आणि हेन्री निकोल्स हे दोघेही खंबीरपणे उभे राहिले. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ३५६ धावा जोडल्या. ज्यावेळी न्यूझीलंडचा संघ फलंदाजीला आला त्यावेळी संघाची धावसंख्या १ गडी बाद १७४ इतकी होती. कॉन्वे ७९ धावांवर नाबाद होता. तर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या जेकब डफीने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून ६१ धावांची भागीदारी केली. डफी चांगली फलंदाजी करत होता पण त्याला ३६ धावांवर माघारी परतावं लागलं.
डफी बाद झाल्यानंतर निकोलस फलंदाजीला आला. या दोघांनी मिळून ११० धावांची भागीदारी केली. या डावात कॉन्वेने २४५ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. कॉनव्हे बाद झाल्यानंतर, रचिन रविंद्रने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ४८ चेंडूत अर्धशतक आणि १०४ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने १५० धावा पूर्ण केल्या. रचिनने १५० धावा पूर्ण केल्यानंतर निकोल्सने देखील १५० धावा पूर्ण केल्या. यासह न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांनी १५० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला.